नवी दिल्ली : अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोलकात्यातील दुर्गा पूजा आणि इथली देखावा चांगलाच वादात अडकला आहे. कारण या दुर्गा पूजेच्या देखाव्यात महात्मा गांधींसारखा दिसणारा एक पुतळा ठेवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता या दुर्गा पूजेत राक्षस म्हणून धोतर नेसलेला हातात काठी असलेला हा पुतळा हुबेहुब महात्मा गांधींसारखा घडवण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या वादावर आयोजकांनी पुतळ्याचे आणि महात्मा गांधींमधील साम्य योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे. दुर्गा पूजेतील या देखाव्यावर राज्यातील सत्ताधारी तृणमुल काँग्रेस, भाजपा, सीपीआय-एम, काँग्रेससह सर्व पक्षांनी टीका केली आहे.
“टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती गांधींच असण्याची गरज नाही. या देखाव्यातील राक्षसाजवळ ढाल आहे. गांधींकडे ढाल कधीच नव्हती. आमच्या देखाव्यात दुर्गा देवीने वध केलेला राक्षस गांधींसारखा दिसणे योगायोग आहे”, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पश्चिम बंगालचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिले.
असभ्यतेची उंची गाठल्याचे म्हणत तृणमूल कांग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल घोष यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “हा भाजपाचा खरा चेहरा आहे. भाजपा बाकी जे करते ते नाटक आहे. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. जगाकडून गांधी आणि त्यांच्या विचारधारेचा आदर केला जातो. गांधींचा अशाप्रकारे अपमान सहन केला जाऊ शकत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असे घोष यांनी म्हटले आहे.
भाजपा आणि संघाला केवळ भारताचे विभाजन कसे करायचे हेच कळते. ब्रिटिशविरोधी शक्तींना ते ‘असुर’ मानतात आणि दुर्गा मातेला ब्रिटिश, अशी टीका सीपीआय-एमच्या केंद्रीय समितीचे सदस्य समिक लहिरी यांनी केली आहे. रविंद्रनाथ टागोर यांनी गांधींना महात्मा असे संबोधले होते. अशा महान व्यक्तीचा अपमान केवळ भारतासाठीच नव्हे तर देशासाठी शरमेची बाब आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सौम्या रॉय यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोलकात्यातील या वादग्रस्त देखाव्यावर भाजपाचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. “अशा गोष्टींना आम्ही पाठिंबा देत नाही, हे संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. प्रशासनाने आयोजकांवर याबाबत तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणी भट्टाचार्य यांनी केली आहे.