नगरविकास मंत्री शिंदे यांची माहिती
पुणे – राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी जी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली, ती सर्वसामान्यांच्या घरात स्वप्नपूर्तीसाठी आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘क्रेडाई महाराष्ट्र’ आणि “एमसीएचआय’ यांनी संयुक्तपणे शिंदे आणि नगरविकास अधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम वेबिनारच्या माध्यमातून पार पडला. या नियमावलीद्वारे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास व घराच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या विकासावर आणि बांधकाम व्यवसायावर दूरगामी, चांगले परिणाम होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील भरीव मदत होणार आहे.
शेतीनंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा बांधकाम व्यवसाय असून गेली तीन-चार वर्षांपासून या व्यवसायाला आलेली मरगळ दूर होऊन मोठ्या प्रमाणात व्यवसायात चालना मिळणार आहे, असे शिंदे म्हणाले.
नगरविकास प्रधान सचिव भूषण गगरानी, नगर रचना संचालक सुधाकर नागपुरे, नगर रचना सहसंचालक प्रकाश भुक्ते, अविनाश पाटील यांचा सत्कार क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, पुणे शहर अध्यक्ष सुहास मर्चंट यावेळी उपस्थित होते. राज्यभरातून जवळपास 600 बांधकाम व्यवसायिक आणि वास्तुविशारद या वेबिनारमध्ये सहभागी झाले.