नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि कुटूंबियांचा निर्णय
पुणे(प्रतिनिधी) : करोनासंकटाच्या काळात चंदनगरमधील महापालिकेचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि त्यांच्या कुटूंबियांनी चंदननगर मध्ये नव्याने उभारलेले आपले 20 बेडचे हॉस्पीटल महापालिकेस करोना रूग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ( बुधवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने या हॉस्पीटलचे लोकार्पन केले जाणार आहे. विशेष बाब मध्ये या हॉस्पीटलमध्ये 15 बेड हे ऑक्सिनची सुविधा असलेले असून उर्वरीत 5 बेडलाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती नगरसेवक जाधव यांनी दिली.
जाधव यांच्या कुटूंबात त्यांचे बंधू भाऊसाहेब जाधव, भाऊ साहेबांच्या पत्नी मनिषा तसेच भैय्या साहेबांच्या पत्नी रेखा या डॉक्टर आहेत. तर ते स्वत: वकील असून त्यांचे आणखी एक बंधू अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी विद्या या वकील आहेत. तर भैय्यासाहेब यांची बहिण आशा कोटंबे या सुध्दा डॉक्टा आहेत त्यामुळे घरात तीन डॉक्टर असल्याने या कुटूंबाने चंदननगर येथे तुकाई हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हा हॉस्पीटलचे काम आता पूर्ण झाले आहे.
त्यामुळे हे हॉस्पीटल लवकरच या कुटूंबाकडून सुरू केले जाणार होते. मात्र, करोना संकटाच्या काळात हे पूर्ण होत असतानाच, जाधव यांच्या एका निकटवर्तीयाला ऑक्सिजनचा बेड न मिळाल्याने प्राण गमवावा लागला. तसेच शहरात सर्वत्रच ही स्थिती आहे. ही गंभीर बाब आणि सद्यस्थितीतील करोना रूग्णांवरील उपचाराची गरज लक्षात घेऊन भैय्यासाहेब जाधव यांचे वडील माजी न्यायाधीश तुकाराम जाधव आणि आई केवळाबाई यांच्या सूचने नुसार,जाधव कुटूंबियांनी नव्याने उभारलेले हॉस्पीटलच महापालिकेस करोना बाधितांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी तत्काळ महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे प्रस्ताव देऊन तो आरोग्य विभागालाही देण्यात आला. त्यानुसार, कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या 3 ऑगस्ट पासून हे हॉस्पीटल सुरू आहे. मात्र, त्याच वेळी भैय्यासाहेब जाधव ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत. त्या पक्षाचे राज्याचे नेतृत्व असलेल्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने या हॉस्पीटलचे लोकार्पन केले जाणार आहे.