हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश; नियमांचे पालन करीत नसल्याचा आरोप
मुंबई: नियमांचे पालन न करताच मुंबई आणि मुंबई महानगर परिसरात 2012 च्या सेल्फ फायनान्स स्कूल्स कायद्याच्या आधारे कोचिंग क्लासनी सुरू केलेल्या ज्युनियर कॉलेजांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली.
कायदा केला असला तरी त्याचे नियमच तयार करण्यात न आल्याने न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. शिक्षण विभागाच्या या कारभारावर ताशेरे ओढत पुढील सुनावणी होई पर्यंत नव्या कॉलेजना परवानगी देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले.
सेल्फ फायनान्स स्कूल्स कायदा 2012 च्या आधारे खासगी कोचिंग क्लासेसच्या मालकांनी जागो जागी ज्युनिअर कॉलेज थाटली. मात्र अनेक तथाकथित कॉलेजेसमध्ये कायद्याचे पालनच होत नसल्याच्या आरोपावरून या कॉलेजांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मंजू जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने कायदा तयार केला असला तरी त्याचे नियमच तयार करण्यात न आल्याने न्यायालयाने शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला. आधी नियम बनवा आणि राज्य व जिल्हास्तरीय छाननी समित्या करून त्यानंतरच दोषींवर कारवाई करा. तसेच पुढील सुनावणी पर्यंत नव्या कॉलेजना परवानगी देऊ नका, असे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.