भारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे

नवी दिल्ली : भारतातील पंजाब, हरियाना आणि महाराष्ट्रातील क्रीडनगरी म्हणून ओळखली जाणारी शहरे सोडून आता ओडिशा, आसाम, ईशान्येकडील राज्ये, झारखंड आदी राज्यातील छोट्या गावांमधून ऑलिंपिकपर्यंत भरारी मारणार खेळाडू गेल्या काही वर्षात तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे देशाच्या क्रीडासंस्कृतीचा नवा नकाशा तयार होताना दिसत आहे.

झोकून देऊन प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, विविध माध्यमांतून निधी उभा करण्याचे पर्याय, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विविध राज्यातील सरकारांनी सुरू केलेल्या प्रोत्साहन योजना यामुळे ही नवीन गावे-शहरे क्रीडा संस्कृतीची केंद्रे बनू लागली आहेत. आता जागतिक दर्जाचे बॅडमिंटन खेळाडून नागपूरसारख्या शहरातून, धावपटू तिरूचिरापल्लीतून आणि आशादायक कामगिरी करणारे जिम्नॅस्ट त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातून पुढे येऊ लागले आहेत. या सगळ्या वाटचाली ईशान्येकडी राज्यांचे यश नजरेत भरण्यासारखे आहे.

आसाममधील गुवाहाटी तसेच मणिपूर, त्रिपुरा या राज्यातूंन जागतिक कामगिरी करणारे खेळाडू तयार होत आहेत. झारखंडमधील जमशेदपूर, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर, कर्नाटकातील बेंगळुरू बरोबरच मंगळुरू शहरानेही आपली क्रीडा ओळख निर्माण केली आहे. तमीळनाडूतील तिरुचिरापल्लीतून धावपटू तयार होत आहेत.

मुष्टीयुद्ध (आसाम) – शिवा थापा, जमुना बोरो, लवलीना बोर्गोहाईन, भाग्यब्ती कचरी आणि धावपटू हिमा दास अशा खेळाडूंमुळे आसाममधील गुवाहाटी हे मुष्टीयोद्धे आणि धावपटूंचे गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र बनले आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी लवलीना बोर्गोहाईन ही आसाममधील पहिली मुष्टीयोद्धा ठरली आहे. शिव थापानंतर आसाममधून ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लवलीनाला मिळाली आणि तिने त्याचे सोने केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणातील मुष्टीयोद्धा प्रशिक्षक पदुम बोरो यांनी लवलीना 13 वर्षांची असताना तिच्यातील गुणवत्ता हेरली होती.

धावपटू – (तिरुचिरापल्ली – तमीळनाडू) – तिरुचिरापल्लीतून तयार झालेले धावपटू अरोकिया राजीव, एस. धनलक्ष्मी आणि व्ही शुभा हे टोकिया ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले आहेत. फेडरेशन कप, इंडियन ग्रँड प्रिक्सच्या स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांना ऑलिंपिक पात्रता गाठता आली आहे. धनलक्ष्मीचे दीर्घकाळचे प्रशिक्षक असणारे मणिकंदन अरुमुगम या सगळ्याचे क्रेडीट तिरुचिरापल्ल्ती तयार झालेल्या अनुकूल क्रीडा वातावरणाला देतात. शालेय पातळीवर तसेच जिल्हा आणि राज्य पातळीवर नियमितपणे मैदानी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातून क्षमता आणि गुणवत्ता असणारे चमकदार खेळाडू पुढे येतात. अशा खेळाडूंना तिरुचिरापल्लीतील क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्राकडून आवश्यक त्या सुविधा मिळतात. त्यामध्ये मोफत भोजन, क्षमतावाढीसाठी अत्याधनिक प्रशिक्षण सुविधांचा समावेश होतो, असे मणिकंदन म्हणतात.

सायकलिंग – (बेंगळुरू – कर्नाटक) – बेंगळुरूमध्ये नियमित होणाऱ्या दोन लोकप्रिय सायकल शर्यती म्हणजे बेंगळुरू बायसिकल चाम्पियनशिप्स आणि बेंगळुरू अमॅच्युअर रेसिंगद्वारे गुणवान खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे विविध राज्यांमधील सायकलपटूंनी बेंगळुरूमध्ये स्थायिक होणे पसंत केले आहे. शहरात महिन्याला दोन तरी सायकल शर्यती होतात. त्यामुळे शहारात सायकल शर्यतीची संस्कृती विकसित होत आहे. अशा पद्धतीच्या शर्यती देशात कुठेही होत नसल्याचे सहा वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे सायकलपटू नवीन जॉन सांगतात.

तिरंदाजी (जमशेदपूर – झारखंड) – जमशेदपूरमधील टाटा तिरंदाजी अकादमी हे खेळाडूंसाठी वरदान ठरलेली आहे. तिरंदाजांना प्रशिक्षण आणि त्यांच्या क्षमतावाढीसाठी या अकदामीच्या योगदानामुळे झारखंड हा देशातील तिरंदाजीचा तळ बनला आहे. दीपिका कुमारी, कोमलिका बारी आणि अंकिता भाकत या तिघीही या अकादमीतून पुढे आल्या आहेत. भारतीय महिला तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षक पूर्णिमा महातोदेखील याच अकादमीच्या तिरंदाज आहेत.

हॉकी – (ओडिशा आणि मणिपूर) ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. आता हळूहळू खेळाडूंचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. हॉकीतील चाम्पियन्स ट्रॉफी आणि आशियाई अथलेटिक्स स्पर्धा येथील कलिंगा स्टेडियमवर झाल्यानंतर क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळाले. स्टेडियममधील हॉकी टर्फही अत्याधुनिक करण्यात आले आहे.

2018 मध्ये ओडिशात हॉकी वर्ल्ड कप झाला आणि भुवनेश्वरमधील हॉकी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले तसेच आणखी एक मैदान तयार करण्यात आले.त्याचबरोबर भारतीय क्रीडा क्षेत्रात मणिपूर हे छोटेसे राज्य उर्जाकेंद्र बनले आहे. या छोट्याशा राज्याने आतापर्यंत 16 ऑलिंपिक खेळाडू घडवले आहेत. त्यापैकी सात जण हॉकीपटू आहेत. अस्ट्रोटर्फ मैदानाची सुविधा आणि स्थानिक समर्पित प्रशिक्षकांमुळे हॉकीसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे.

जिम्नॅस्टिक – (त्रिपुरा) आतापर्यंत त्रिपुरामध्ये 60 राष्ट्रीय विजेते जिम्नॅस्ट घडलेले आहेत. ही 1980 च्या दशकापर्यंतची गोष्ट, 90 नंतर पुन्हा एकदा जिम्नॅस्ट घडवण्याची प्रक्रिया सुरु झाली. 2014 मध्ये दीपा कर्माकारने राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक पटकावले आणि देशाचे लक्ष पुन्हा एकदा त्रिपुराकडे गेले.

वॉटर स्पोर्टस् (मंगळुरू) – कर्नाटकच्या किनारपट्टीवरील या शहराता अनेक बीच आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने पर्यटनातील संधी ओळखून त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हा त्यांना आणखी एक क्षेत्र गवसले ते म्हणजे वॉटर स्पोर्टस्. सर्फिंग, कयाकिंग, सेलिंग असा क्रीडा प्रकार रंगू लागले.

2013 मध्ये दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होडसने मंगळुरूपासून 30 किलोमीटरवरील मुलकी येथे वॉटर स्पोर्टससाठी भेट दिली आणि हा परिसर जलक्रीडांसाठी प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक वॉटर स्पोर्टस् क्लब तयार झाले आणि गेल्या काही वर्षात अनेक मच्छिमारांची मुले स्पर्धात्मक सर्फिंगमध्ये भाग घेऊ लागली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.