मुंबई – राज्याचे नवे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी राज्यातील विविध विषयांवर पवारांशी चर्चा केली. कुंटे हे यांनी या आधी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले असून ते 1985 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
त्यांची गेल्या शनिवारीच राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंटे यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी ट्विटरवर माहिती देताना पवार यांनी म्हटले आहे की, राज्यातील कोविड स्थिती, लसीकरण यासह अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांच्याशी आपली चर्चा झाली.
मुख्य सचिव म्हणून त्यांच्या नवीन कारकिर्दीला आपण शुभेच्छाही दिल्याचे पवारांनी म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एक महत्वाचा घटक पक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे.