संवादाचे नवे केंद्र

कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना किती प्रवाही आहे, किती नव्या प्रवाहांना स्वतःमध्ये सहभागी करून घेत आहे, बदलते तंत्रज्ञान कितपत आत्मसात करीत आहे, हे समजून घेण्यासाठी त्या पक्षाचे वा संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय कशा पद्धतीचे आहे, हे पाहणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्या पक्षाला विद्यमान कार्यालयाची जागा कमी पडत असेल, तर त्या पक्षाचा आकार वाढत आहे आणि समाजातील नवीन घटक त्या पक्षामध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत, हे सहज लक्षात येते. याच तत्त्वांना अनुसरून, पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. पक्षाच्या दैनंदिन कामांबरोबरच कार्यकर्त्यांसाठी, नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण असावे, यासाठी पक्षाचे कार्यालय आता महानगरपालिकेजवळील नव्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे.

पक्षाचे कार्यालय हे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि राजकीय संवादाचे केंद्र असायला हवे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी आता संवादाचे नवे केंद्र निर्माण होत असून, आज कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.

माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवाजी पार्क येथे १० जून १९९९ रोजी चैतन्यमय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. नुकताच पक्षाचा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घडामोड होती.

आदरणीय पवार साहेबांवरील निष्ठा, प्रेम आणि साहेबांच्या व्यक्तीमत्त्वाने भारावलेले अनेक तरुण, तरुणी, कार्यकर्ते आणि नेते पक्षात सहभागी होत होते. हे केवळ पुणे शहरातच नव्हे, तर राज्यात आणि देशातही घडत होते. ज्या राजकीय अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर साहेबांनी एका स्थिर पक्षाची स्थापना केली, तेव्हा अनेकांना संधीची दारे उघड होणार याची खात्री पटली होती. त्याची चुणूक शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक सभेतच दिसून आली होती.

काँग्रेस पक्षातील मोठा गट पक्षात येत होता. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीची सुरुवात होती. पक्ष म्हणून नव्याने सुरुवात होत असताना अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात करावयाची होती. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी आपली स्वतंत्र व हक्काची जागा असावी, अशी साहेबांची भूमिका होती. त्यामुळे, पक्षाच्या कार्यालयापासून ते सर्वच गोष्टी नव्याने उभ्या करणे आवश्यक होते. त्या वेळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या जुन्या वाड्यात पक्षाचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला.

अवघ्या १५० चौरस फुटाच्या जागेत पक्षाचे पहिले कार्यालय सुरू झाले. तशी ही जागा लहान आकाराची होती. मात्र, कार्यकर्त्यांसाठी एक हक्काचे केंद्र उपलब्ध झाले होते. या कार्यालयाबाहेर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर कार्यालय’ असा फलक झळकला आणि खऱ्या अर्थाने पक्षाच्या पुणे शहरातील कार्याला सुरुवात झाली. त्यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष शांतिलालजी सुरतवाला होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या अनेक तरुणांनी कार्य करण्यास सुरुवात केले. तो भारावण्याचा, जोमाने कामाला लागण्याचा काळ होता. आमच्या धडपडीला दिशा देण्याचे काम आदरणीय शांतिलालजी यांनी केले. महानगरपालिकेतील घडामोडींच्या चर्चा आणि नव्या दिशा ठरविणाऱ्या ‘ऑलिम्पिया’ हॉटेलच्या वरच्या बाजूला हे कार्यालय होते.

आतापर्यंत हॉटेल ‘ऑलिम्पिया’मध्ये महानगरपालिकेतील गोष्टींवर चर्चा होत होती आणि पुढील दिशा ही वरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून ठरणार, असे सूचक संकेत यातून मिळत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सुरतवाला आणि त्यांच्यानंतर रवींद्रअण्णा माळवदकर या शहराध्यक्षांनी याच ठिकाणाहून पक्षाचा कारभार पाहिला.

पक्षाच्या कार्यालयाचा आकार किती आहे, ही गोष्टच कुणाच्या मनात येत नव्हती. कार्यालय छोटे असले, तरी आपल्याला पक्षाचे काम करायचे आहे, पक्ष वाढवायचा आहे, हा हुरूपच सर्वांच्या मनात होता.

माळवदकर यांच्यानंतर अण्णासाहेब थोरात पक्षाचे शहराध्यक्ष झाले. पक्षाचा विस्तार होत होता. कार्यालयात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, नागरिकांची वर्दळ होती. परंतु, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, बसण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, ही अडचण त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे, त्यांनी त्यांचे निकटचे नातेवाइक गिरे कुटुंबीयांना पक्षाच्या कार्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली आणि गिरे कुटुंबानेही तत्काळ ही विनंती मान्य करून गिरे बंगल्याची जागा पक्षासाठी उपलब्ध करून दिली.

त्यानुसार, २००३ मध्ये पक्षाचे कार्यालय टिळक रोडवर हिरा बाग चौकातील गिरे बंगल्यामध्ये स्थलांतरित झाले. पक्षाच्या कार्यालयाला आता नवी जागा मिळाली होती. गिरे बंगल्यातील वाड्यामध्ये गेली १८ वर्षे पक्षाचा कारभार चालला. या काळात पक्षाचा केंद्रातील सत्तेत सहभाग राहिला. राज्यातील सत्तेत सहभाग राहिला.

२००७ आणि २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर विराजमान झाले. हे सर्व धवल यश मिळत असताना, गिरे बंगल्यातील कार्यालय त्याचे सर्वांत जवळचे साक्षीदार होते. या काळातील पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यातील संवाद असो, निवडणुकीसाठीची रणनीती असो अनेक निवडणुकांच्या निकालानंतरचा, निवडीनंतरचा, पक्षाच्या वर्धापनदिनाचा जल्लोष गिरे बंगल्याच्या कानात साठवले गेले असतील.

इतके गिरे बंगला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना जोडले गेले आहेत. अण्णासाहेब थोरात यांच्यानंतर जयदेवराव गायकवाड, वंदनाताई चव्हाण, चेतन तुपे यांनी शहराध्यक्ष म्हणून याच कार्यालयातून जबाबदारी पार पाडली. आता पक्षाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही जागा पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी महत्त्वाची होतीच. त्यामुळे, पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी या बंगल्याशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. त्याचबरोबर गिरे कुटुंबीयांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब, अजितदादा यांच्यावरील प्रेम हे शब्दांत व्यक्त न होणारे आहे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता गिरे कुटुंबीयांनी पक्षाच्या कार्यालयासाठी ही जागा उपलब्ध करून दिली. सलग १८ वर्षे हा बंगला पक्ष कार्यालयासाठी दिल्यानंतर गिरे कुटुंबीयांनी एक रुपयाही भाडे पक्षाकडून घेतले नाही. याउलट, या जागेसाठी असणारा महानगरपालिकेचा कर, वीज बिल हे कुटुंबच परस्पर भरत होते. एखाद्या व्यक्तीने किती निस्पृह आणि निरपेक्ष भावनेतून पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर प्रेम करावे, याचे हे खूप मोठे उदाहरण आहे.

गेल्या दोन दशकांचा विचार करताना, परिस्थितीमध्ये किती आमूलाग्र बदल झाला, हे आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळते. पुण्याचा विस्तार झाला असून, ते आता महानगर होऊ पाहात आहे. शहराची लोकसंख्या ५० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

एखादा विचार जनतेपर्यंत पोहोचवायची पद्धत बदलत आहे, शरद पवार साहेब, अजित दादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांकडे, धोरणांकडे आकर्षित होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये युवा वर्गाचे प्रमाण जास्त आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि वाढत्या गरजांनुसार पक्षाच्या कार्यालयासाठी आणखी जागा असावी, असा विचार काही दिवसांपासून समोर येत होता.

सात मे २०२१ रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष झाल्यानंतर, मी आदरणीय अजितदादांकडे पक्ष कार्यालयासाठी नवीन जागेची आवश्यकता असल्याची विनंती केली. त्यावर अजितदादांनीही नवीन कार्यालयासाठी तत्काळ परवानगी दिली. तसेच, कार्यकर्त्यांना सामावून घेणारे, समजून घेणारे, आपलेसे वाटणारे कार्यालय कसे असावे, याबाबत सूचना केल्या.

या सूचनांचा विचार करून नवीन पक्ष कार्यालयासाठीच्या हालचाली सुरू झाल्या. माझे मित्र श्री. राजेंद्र दुगड यांच्या सहकार्याने एक जागा उपलब्ध झाली. त्यातूनच महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेली ही जागा कार्यालयासाठी निश्चित करण्यात आली. या नव्या जागेत आता पक्षाचे कार्यालय स्थलांतरित होत आहे.

प्रशस्त बैठक व्यवस्था, कालबद्ध कार्यक्रमांची रुपरेषा मांडणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, सोशल मीडियासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, स्वतःचा स्टुडिओ उभारून शहर आणि प्रदेश संघटनेसाठी भूमिका मांडण्याची सोय उभी करणे, पक्षाचे दैनंदिन उपक्रम, कार्यक्रम प्रसारित करण्याची सोय करणे, युवकांना सहभागी करून घेणे, महिला सबलीकरणाचे कार्यक्रम आखणे, उपेक्षित वर्गांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखणे अशा अनेक गोष्टी या नव्या कार्यालयात करणे शक्य होणार आहे.

याचबरोबरीने, सामान्य जनतेमधून येणारा आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचे ठिकाण असावे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांच्या शंका-प्रश्नांचे समाधान करणारे केंद्र म्हणून हे कार्यालय उपयोगी पडावे, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आतापर्यंतचा प्रवास पाहिल्यानंतर, निश्चितच पक्ष संघटना म्हणून आम्ही हा प्रवास पूर्ण करू, असा विश्वास आम्हाला वाटतो.

आज, उद्घाटन होत असलेले हे नवे कार्यालय यापुढील पक्षाच्या वाटचालीचा एक महत्त्वाचा साक्षीदार असेल, यात काही शंका नाही. तसेच, टिळक रोडवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जात असताना त्याच्या नजरा आपोआपच गिरे बंगल्याकडे वळतील, हे निश्चितच. जेव्हाही गिरे बंगला नजरेस पडेल, तेव्हा हेच वाटेल की, या बंगल्याने कार्यकर्त्यांना आधार दिला. पक्षाला बळ दिले. त्या बळाच्या जोरावरच आपण नव्या कार्यालयात स्थलांतरित झालो आहोत, याची कायम आठवण होत राहील.

प्रशांत जगताप
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.