नवे कॅग मुर्मू यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी देशाचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) गिरीशचंद्र मुर्मू यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर मुर्मू यांनी पदभार स्वीकारला.

याआधीचे कॅग राजीव महर्षी यांचा कार्यकाळ शुक्रवारी समाप्त झाला. त्यांच्या जागी मुर्मू यांची नियुक्ती झाली. त्यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या सोहळ्याला उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मावळते कॅग महर्षी आदी उपस्थित होते. कॅगपदी नियुक्ती होण्याआधी मुर्मू यांनी जम्मू-काश्‍मीरच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली.

ओडिशात जन्मलेले मुर्मू भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) निवृत्त झाले आहेत. ते आयएएसच्या 1985 मधील तुकडीचे गुजरात केडरचे अधिकारी होते. मुर्मू हे मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिव म्हणून मुर्मू यांनी कार्य केले होते. त्यांना कॅग म्हणून 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत कार्यकाळ लाभेल.

Leave A Reply

Your email address will not be published.