नवी दिल्ली : मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजस्थानच्या राजकारणात गोंधळाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसत आहे. कारण आज राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. यामध्ये 15 नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री असतील असे सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात 8 नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून तीन राज्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बडती देण्यात आली आहे. याशिवाय, चार नेत्यांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचे प्रमोशन झाले आहे.
राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. हेमा राम चौधरी आणि रमेश मीणा यांना सचिन पायलट गटाकडून मंत्रिपद देण्यात आले आहे. बृजेंद्र ओला आणि मुरारी मीणा यांना सचिन पायलट गटातील राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. राजेंद्र गूढा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी गूढा एक आहेत. विश्वेंद्र सिंह यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. याशिवाय रमेश मीणा यांना पुन्हा कॅबिनेटपद मिळाले आहे.
दरम्यान, शनिवारी मंत्रिमंडळातील नेत्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे दिला. राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सत्ता संघर्षात काही नेत्यांना आपली मंत्रिपद गमवावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, रविवारी दुपारी 4 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे प्रभारी अजय माकन हे राजस्थानमध्ये पोहोचले आहेत.