नवी दिल्ली – एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे जो राष्ट्रध्वज लावलेला दिसला त्या झेंड्यात हिरव्या रंगाची पट्टी अधिक मोठी दिसली आहे. त्या तिरंग्यात पांढऱ्या रंगाची पट्टी आक्रसून हिरव्या रंगाची पट्टी वाढलेली दिसत आहे. हा तिरंग्याचा अपमान आहे अशी तक्रार एका केंद्रीय मंत्र्याने केली आहे. प्रल्हाद पटेल असे या केंद्रीय मंत्र्यांचे नाव आहे.
त्यांनी म्हटले आहे की कोविड उपाययोजनांच्या संबंधात आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती त्यात केजरीवालांच्या मागे जो राष्ट्रध्वज लावलेला दिसला त्यात मला हिरव्या रंगाची पट्टी अधिक मोठी असल्याचे आढळून आले. ध्वजाच्या रचनेत त्यांच्याकडून हा अक्षम्य प्रकार झाला आहे असा आरोप त्यांनी केला.
याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहून या प्रकाराची दखल घेण्याची सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जेव्हा जेव्हा केजरीवाल व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात त्या प्रत्येक वेळी माझे लक्ष त्या ध्वजाकडे जाते. केजरीवाल हे केवळ शोभेसाठी राष्ट्रध्वज लावतात असा आरोपही त्यांनी केला. हा विषय मी मुख्यमंत्री केजरीवालांकडेही उपस्थित केला पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.