आणखी 14 जणांचा मृत्यू : दिवसांत 609 डिस्चार्ज
पाच हजार टेस्ट दररोज घेण्याचे प्रशासनाचे नियोजन
पुणे – शहरात शुक्रवारी दिवसभरात 903 करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे बाधितांच्या एकूण संख्येने 26 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, दिवसभरात करोनामुळे 14 बाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यूच्या संख्येनेही 800 चा टप्पा गाठला.
एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना, अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे. सद्यस्थिती शहरात अत्यवस्थ बाधितांची संख्या 443 वर पोहोचली आहे. बुधवारी (दि.10) दिवसभरात 3 हजार 529 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तर 786 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली. तब्बल 4 हजार 315 पर्यंत तपासणी क्षमता गेली असून, लवकरच दिवसाला पाच हजार टेस्ट घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
सद्यस्थितीत शहरातील डॉ. नायडू, ससून आणि खासगी रुग्णालयांत मिळून 9 हजार 89 बाधितांवार उपचार सुरू आहेत. त्यातील 443 जणांची प्रकृती चिंताजनक असून, तब्बल 74 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे, तर 369 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात 609 जण करोनामुक्त झाले असून, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्खा 16, 188 झाली आहे. सध्या 16 हजार 282 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.