नेवासा – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज सकाळी नगर – छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले.
यावेळी सुमारे अर्धा तास आंदोलकांनी महामार्ग अडवून ठेवला होता त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झालेली व वाहनांच्या रांगा वाढत लागलेल्या होत्या त्यामुळे महसूल व पोलिसांनी आंदोलकांना रास्ता रोको आवरता घेण्याचे सांगितले मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून हा रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी बोलतांना संतोष काळे यावेळी म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या,सगे-सोयरे कायदा पारित करा,अशा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या एक – दिड वर्षांपासून जरांगे यांचा पाठपुरावा आणि लढा सुरू झालेला आहे.जरांगे यांनी राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत दिलेली होती माञ सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे, ते पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले असून त्यांच्या उपोषणाला हा आज ९ वा दिवस आहे जरांगे यांची तब्येत खालावत चालली आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप उपोषणाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही यावेळी काळे यांनी केला.
त्यामुळे सकल मराठा समाज बांधवांकडून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याआंदोलनाचे नेत्तृत्व संभाजी माळवदे यांनी केले तर आंदोलनात संतोष काळे, गणपत मोरे,अनिल ताके,ञिंबक भदगले,गणेश झगरे, अभिषेक पटारे,शेषराव गव्हाणे,गणेश चौगुले, रावसाहेब घुमरे,पोपटे शेकडे,जालिंदर निपुंगे,अंजुम पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांचे निवेदन मंडलाधिकारी सरिता मुंढे मुकिंदपूक कामगार तलाठी आकाश जोशी आणि नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी स्विकारले यावेळी पो.नि.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शैलेंद्र ससाणे, विजय भोंबे,मनोज आहिरे,वाहतुक शाखेचे किरण गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिवसेंदिवस आंदोलनाची धार कमी…
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसून सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पडत असतांनाही नेवासा फाटा येथे झालेल्या आंदोलनात मोजकेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते त्यामुळे आंदोलनाची तिव्रता यावेळी कमी झाल्याचे चिञ दिसून आल्याची चर्चा झडत होती.