नेवासा- भू लोकीचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुदेव दत्त पीठाचे संस्थापक श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या ४२व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शनिवार, २२ मार्च रोजी शेकडो दिंड्यांनी हजेरी लावली. लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेय आणि श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी “श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय” च्या जयघोषाने देवगड नगरी दणाणून गेली. वारकऱ्यांच्या या प्रचंड गर्दीमुळे देवगडला महाकुंभाचे स्वरूप प्राप्त झाले.
या पुण्यतिथी सोहळ्याचा मुख्य दिवस असलेल्या २२ मार्च रोजी पहाटे वेदमंत्रांच्या गजरात महंत श्री भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेय आणि किसनगिरी बाबांच्या मूर्ती तसेच समाधीवर अभिषेक करण्यात आला. यावेळी ‘किसनगिरी विजय ग्रंथ’ चे सामूहिक पारायण झाले. मंदिर प्रांगणात दाखल झालेल्या शेकडो दिंड्यांचे भास्करगिरीजी आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.
अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो दिंड्यांनी “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” चा नामजप करत मंदिर परिसरात उत्साह भरला. भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन गाणारी मंडळी, फुलांनी सजलेल्या रथातील किसनगिरी बाबांची प्रतिमा, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला आणि बालिका यामुळे मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
दुपारच्या सत्रात महंत शिवानंदगिरीजी महाराज, भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज आणि महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेय आणि किसनगिरी बाबांच्या मूर्तीची महाआरती झाली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, उद्योजक प्रभाकरकाका शिंदे, बाळासाहेब शिंदे, अमित मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंदिर प्रांगणात जमलेल्या हजारो भाविकांमुळे महाकुंभाचे दृश्य निर्माण झाले होते. दिंडीतील भाविकांसाठी प्रवरा नदीकाठच्या प्रसादालयात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सावखेडा येथील महंत कैलासगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज, अकोला येथील ब्रह्म स्वरूपानंदगिरी महाराज यांच्यासह अनेक संत-महंतांनी हजेरी लावली. दिवसभरात लाखो भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. सुलक्षण यज्ञ मंडपात उमाकांत कंक आणि जयाताई कंक या दांपत्याच्या हस्ते महाविष्णू याग पूजा झाली, तर मंदिर सभामंडपात चांदीच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
भास्करगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली २२ ते २७ मार्च या सहा दिवसांच्या सोहळ्यात युवा कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या सुश्राव्य वाणीतून किसनगिरी बाबांचे चरित्र कथन होणार आहे. रात्रीच्या सत्रात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होत असून, या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवगड संस्थानने केले आहे.