नेवासा – आयुष्यातील ज्या शिक्षण संस्थेत गेली 27 वर्ष शिपाई पदावर सेवा केली. त्याच विद्यालयात सेवा निवृत्ती नंतर अवघ्या महिनाभरानंतरच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिपाई असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला विद्यालयात मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर व शाळा व्यवस्थापनाने झेंडावंदन करण्याचा मान दिला. यामुळे मन भारावून गेल्याचा सुखद आनंद मिळाला असल्याचे सांगत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिपाई रमेश विठ्ठल गरुटे यांनी झेंडावंदन केल्यानंतर आपल्या भावनेचा बांध फोडला.
नेवासा शहरातील तालुका विद्या प्रसारक मंडळाचे कै.सौ.बदामबाई धनराजशेठ गांधी विद्या मंदिर हे माध्यमिक विद्यालय असून या शाळेच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ शिखरावर पोहचलेले आहेत. या विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर हे कडक शिस्तीचे मयाळू शिक्षक म्हणून विद्यालयात परिचित आहेत. त्यांचा आदरयुक्त दबदबा विद्यालयात नेहमीच रहात आलेला असून कोणतेही काम इतरांपेक्षा वेगळ करण्याची सवय त्यांना जडलेली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजीचे झेंडावंदन नेमके कोणाचे हस्ते करायचे? समाजातील बडा अधिकारी आणायचा की, नेता? हा विचार दुर ठेवता ज्या विद्यालयात रमेश विठ्ठल गरुटे यांनी 27 वर्ष शाळेत शिपाई पदावर काम केले त्यांना सेवा निवृत्त होवून अवघा महिनाही उलटलेला नव्हता अशा आपल्या माजी कर्मचाऱ्याचे हस्ते झेंडावंदन करुन अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ज्या कर्मचाऱ्याचा हातात नेहमी विद्यालयाची घंटा वेळेवर वाजत होती त्या कर्मचाऱ्यालाच प्रमुख पाहूणे म्हणून विद्यालयाने सन्मान करुन त्यांच्या हस्ते झेंडा फडकवल्यामुळे या कर्मचाऱ्याचे मनही यावेळी भारावून गेल्याचे चिञ पहावयास मिळाले.
विद्यालयात माजी शिपाई असणाऱ्या गरुटे या कर्मचाऱ्यांच्या हस्ते झंडावंदन संस्थेने केल्यामुळे आपणही विद्यार्थ्यांचे देणे लागतो. या भावनेतून त्यांनी विद्यालयाला रोख 15 हजार तर माझी विद्यार्थी देवेंद्र कडू यांनी शाळा विकासासाठी 21 हजार रुपये रोख देणगी देवून आपल्या शाळेचे हित जपलेचे यावेळी दिसून आले.
ज्यावेळी संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त इतर मान्यवरांची कार्यक्रमाच्या निमित्ताने बडदास्त ठेवण्यासाठी ज्या शिपायाला नेहमीच कार्यक्रमात पुढाकार घ्यावा लागत होता. तेच शिपाई प्रमुख पाहूणे म्हणून विद्यालयात व्यासपीठावर बसल्यामुळे विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट तर केलाच माञ उपस्थितही अवा्क झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूने म्हणून माजी विद्यार्थी देवेंद्र कडू, संस्थेचे सहसचिव विवेक नळकांडे, खजिनदार सुर्यकांत गांधी, माजी उपाध्यक्ष महेश मापारी, संचालक अभय गुगळे, नितीन खंडाळे आदी हजर होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन मुख्याध्यापक नानेकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी – पालक शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.