नेवाशात नगरचे वकील संभाजी ताकेसह एकाची निघृण हत्या.
अहमदनगर : जिल्हा न्यायालयातील अॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी, अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती येथे निघृण हत्या झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी शरद शिवाजी ताके यांस अटक केली आहे. आरोपीकडे कुऱ्हाड जप्त केली आहे.
अॅड. ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. अॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. नेवासा तालुक्यात जेऊर हैबती गावात त्यांची शेती आहे. भावकीसोबत त्यासंबंधी वाद सुरू होते. अलीकडेच कोर्टात ताके यांच्या बाजूने निकाल लागला होता. बुधवारी कोर्टाला सुट्टी असल्याने ताके कामानिमित्त गावी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अन्य एक सहकारी होता. त्यांच्या पुतण्याने मागील भांडणाच्या वादातून ताके आणि त्यांच्या सहकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात दोघेही ठार झाले आहेत. ताके यांच्याबरोबर असलेल्या सहकार्याची ओळख अजून पटलेली नाही. कुर्हाडीने त्यांच्यावर हल्ला झाला असून, घटनास्थळी मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अॅड. ताके यांच्या हत्येची माहिती नगरसह भिंगार शहरात वार्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे.