सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क ठप्प

वॉइस कॉल अचानक डिस्कनेक्‍ट : इंटरनेटही स्लो

पुणे – शहरात प्रामुख्याने सेवा देणाऱ्या बहुतांश टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क ठप्प झाल्याचे चित्र आहे. यामधील अनेक कंपन्यांनी “लवकरच आमची कंपनी सर्वोत्तन नेटवर्क सेवा देणार’ असा केलेला दावा सद्यस्थितीत फोल ठरला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सततच्या नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे ग्राहक त्रस्त आहेत.

मागील अनेक दिवसांपासून वोडाफोन, आयडिया, जिओ, एअरटेल, बीएसएनएल या सर्वच कंपन्यांचे नेटवर्क ठप्प झालेले आहे. यामुळे व्हॉइस कॉल आणि इंटरनेट कोलमडून पडल्याच्या अवस्थेत आहे. सतत घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्राहक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक कंपन्यांकडून एकाच मोबाइल टॉवरहून ग्राहकांना कनेक्‍शन्स दिली जातात. या टॉवरच्या क्षमतेपेक्षा अधिक नेटवर्क वाढल्याने मोबाइल नेटवर्क बंद पडण्याचे प्रकार घडतात.

शहर व परिसरात बहुतांशी कंपन्यांचे नेटवर्क जाम होताना दिसत आहेत. वॉइस कॉल अचानक डिस्कनेक्‍ट होत आहेत. तर, इंटरनेट कॉलही सुरू होत नसल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा नेटवर्कमध्ये “कंजेक्‍शन’ येत असल्याचे दाखवत आहेत. मोबाइल टॉवरवर अतिरिक्त भार पडल्याने सर्व नेटवर्क बंद पडलेले पाहायला मिळत आहेत. या प्रकारामुळे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कबाबतीत अद्यापही सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.