“ई पीक’ पाहणीला “नेटवर्क’चा अडथळा

दुर्गम भागातील शेतकऱ्यांची वाढली चिंता; मुदत संपल्यावर पुढे काय?

प्रशांत जाधव

सातारा  – पारंपरिक पीक पाहणीला बगल देऊन, राज्य सरकारने “ई पीक पाहणी’ची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची नोंद मोबाइल ऍपद्वारे करून “माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे; परंतु हीच ई पीक पाहणी दुर्गम भागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाइल इंटरनेट व नेटवर्क मिळत नसल्याने, पीक पाहणीशिवाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार असल्याची भीती आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करायची पारंपरिक पद्धत आहे. त्यात शेतीतील उत्पादन, जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे सरकारला शक्‍य होते. या नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. ग्रामीण भागात दोन-तीन गावांसाठी एकच तलाठी असल्याने पीक पाहणी वेळेत व अचूक नोंदवली जात नसल्याच्या तक्रारी सरकार दरबारी होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने शेतक्‍यांना पिकांची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी महसूल व कृषी विभाग मिळून काम करत आहेत.

शेतकऱ्यांनीच त्यांच्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर अचूक व वेळेत करावी म्हणून सरकाने “ई पीक पाहणी’ ऍप बनवले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकांची नोंद करायची आहे. सातारा जिल्ह्यात सातारा, माण, खटाव, फलटण, महाबळेश्‍वर, वाई, पाटण या तालुक्‍यांमधील दुर्गम भागांमध्ये कोणत्याच कंपनीचे मोबाइल नेटवर्क व्यवस्थित उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

परिणामी या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद करणे कठीण होणार आहे.
या भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अन्यथा त्या भागातील पीक पाहणी पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांकरवी करावी, अशी मागणी होत आहे. तसे न झाल्यास “माझी शेती, माझा सातबारा कोरा’ अशी अवस्था दुर्गम भागातील शेतकऱ्यांची होण्याची भीती आहे.

ऍप डाऊनलोड होण्यापासून अडचणी
“ई पीक पाहणी’ मोबाइल ऍप डाऊनलोड करण्यापासून अडचणी येत आहेत. अनेक भागात नेटवर्कच्या समस्येमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये ऍप डाऊनलोड झाले नसल्याने नोंदीचा प्रश्‍नच येत नाही. या शेतकऱ्यांचा विचार करून, सरकारने पीक पाहणीला मुदतवाढ देण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने पिकांच्या नोंदी घ्याव्यात, अन्यथा हजारो शेतकरी पीक कर्ज व इतर सवलतींपासून दूर राहतील, अशी प्रतिक्रिया मायणी, ता. खटाव येथील शेतकरी दीपक देशमुख यांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.