सोमेश्वरनगर : राज्य शासनाने शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई मिळण्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली. पण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अन्य समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात मोबाईलला आवश्यक तेवढे डाटा नेटवर्क नसते. त्यामुळे पीक पेरा करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत असते.
शहरी किंवा निमशहरी भागात महा ई सेवा केंद्रावर किंवा कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन ऑनलाइन अर्ज करून पीक विमा काढावा लागतो. त्यावेळी पीक पेरा केला नसल्यास पीक विमा निघत नाही. ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही.
राज्य सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामातील पिकांकरिता एक रूपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. रब्बी ज्वारीच्या पीक विमाकरिता दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत होती. मात्र, सोमेश्वर परिसरातील मुरूम, वानेवाडी, निंबूत, वाघळवाडी, करंजेपूल आदी भागातील शेतक-यांना आपल्या मोबाइलवरून पीक विमाकरिता ऑनलाइन अर्ज करताना मोबाइलच्या नेटवर्कसह माहिती भरण्यास अडचणी येत आहेत.
उन्हाळी भुईमूग या पिकासाठी दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित आहे.