तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची साक्ष नोंदवण्यास आजपासून सुरुवात झाली. आपण एक समर्पित कार्यकर्ते आणि इस्रायलच्याहिताचे रक्षणकर्ते असल्याचे नेतान्याहू यांनी यावेळी संगितले. आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी सपशेलपणे धुडकावून लावले आहेत.
देशाचे रक्षण करत असताना आपल्यासमोर असलेल्या आव्हानांच्या तुलनेत हे भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे समुद्रातील एक थेंब असल्याचे ते म्हणाले. गाझामध्ये इस्रायलचे युद्ध अजूनही सुरू आहे आणि शेजारील सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांचे पतन झाले असतानाही पंतप्रधान म्हणून आपले कर्तव्य असल्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपण न्यायालयात उपस्थित आहोत. आपल्यावरील आरोप मूर्खपणाचे आहेत आणि गेल्या ८ वर्षांपासून हे सत्य सांगण्याची आपण वाट बघत होतो, असेही ते म्हणाले.
नेतान्याहू यांच्यावर गैरव्यवहार, विश्वासघात आणि ३ वेगवेगळ्या प्रकरणातील लाच स्वीकारल्याचे आरोप आहेत. हॉलिवूडमधील अब्जाधीश चित्रपट निर्मात्याकडून हजारो डॉलरचे सिगार आणि शॅम्पेन स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. स्वतः आणि आपल्या कुटुंबीयांबाबत अनुकूल वार्तांकन करणायासाठी माध्यमांवर नियंत्रणे आणण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.