Prime Minister Benjamin Netanyahu – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणच्या हल्ल्यामुळे घाबरले असल्याचे म्हटले जाते आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नेतन्याहू हे पंतप्रधान कार्यालयाच्या तळघरातील स्ट्राँग रूममधून बहुतेक वेळा काम करत असल्याचे इस्रायली मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात सिझेरिया येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानावर हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यानंतर, त्यांना सुरक्षित तळघर-स्तरीय खोली वापरण्याची आणि पूर्वी ज्ञात असलेल्या नेहमीच्या ठिकाणांना भेट देणे टाळण्याची सूचना देण्यात आली होती.
हिजबुल्लाहने 19 ऑक्टोबर रोजी ड्रोन डागले होते. त्यापैकी एकाचा सिझेरिया येथील नेतन्याहू यांच्या घराजवळ स्फोट झाला. ड्रोनने बेडरूमची खिडकी तोडली होती. मात्र, आतमध्ये प्रवेश करता आला नाही, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू घरी नव्हते.
हल्ल्याच्या भीतीमुळेच इस्त्रायलच्या कॅबिनेटच्या बैठकांचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केले जात असल्याच्या बातम्याही आहेत. यासोबतच नेतन्याहू यांचा मुलगा अवनर याचे २६ नोव्हेंबर रोजी होणारे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
China aided Sri Lanka : चीनची श्रीलंकेला 30 दशलक्ष रुपयांची आर्थिक मदत, समोर आलं ‘हे’ कारण….
पुढील महिन्यात जेरुसलेम जिल्हा न्यायालयात नेतन्याहू यांची साक्ष होणार होती. ती पुढे ढकलण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली आहे, जेणेकरून त्यांना आठवड्यातून अनेक वेळा त्याच ठिकाणी जावे लागणार नाही. नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे. कोर्टात सुरक्षित खोली किंवा बॉम्ब निवारा नसल्याचे वृत्त आहे.