वेस्ट पाम बीच (अमेरिका) – इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी भेट घेतली आणि गाझामधील युद्धबंदीबाबतच्या उपाय योजनांबाबतची आशा व्यक्त केली. इस्रायलला मदत देण्याबाबत अमेरिकेत दोन तट पडले असल्यामुळे नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या भेटीमध्ये इस्रायलला अधिक मदत मिळण्यासाठीच्या पाठपुराव्यावर नेतान्याहू यांनी विशेष भर दिला आहे.
फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो इस्टेटमध्ये नेतान्याहू आणि ट्रम्प यांची समोरासमोर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या चार वर्षातील ही पहिलीच भेट होती. युद्धबंदीसाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेली चर्चा यशस्वी व्हावी, अशीच आपली इच्छा असल्याचे नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र अमेरिकेच्या भेटीवर जाण्यापूर्वी नेतान्याहू यांनी या वाटाघाटींना प्रखर विरोधच केला होता. या युद्धामध्ये अपेक्षित विजय अद्याप न मिळाल्याने इस्रायलमध्ये नेतान्याहू यांच्यावर जोरदार टीका व्हायला लागली आहे.
ट्रम्प अध्यक्ष असताना अमेरिका-इस्रायलचे संबंध सर्वसामान्य होते. मात्र २०२० च्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या बायडेन यांचे सर्वात पहिल्यांदा नेतान्याहू यांनी अभिनंदन केले होते. तेंव्हापासून ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील सौहार्द समाप्त झाले होते. मात्र आता ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदाचे उमेदवार झाल्यामुळे नेतान्याहू यांनी हे संबंध सुधारण्यासाठीच ट्रम्प यांची भेट घेतली आहे. गुरुवारीच नेतान्याहू यांनी अध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचीही भेट घेतली होती. इस्रायलला हमासविरुद्धच्या युद्धात मिळत असलेली मदच यापुढच्या काळातही अव्याहतपणे मिळत रहावी, अशी अपेक्षा त्यांनी या दोन्ही नेत्यांकडे व्यक्त केली होती.