विशेष – क्रांतीची मशाल : सुभाषचंद्र बोस

-शशिदा ईनामदार

“भारत’ ही माझी मातृभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून ज्या ज्या नेत्यांनी, क्रांतिकारकांनी प्रयत्न केले, त्यात नेताजी सुभाष जानकीदास बोस हे नाव अभिमानानं गौरवलं जातं. आज 23 जानेवारी त्यांचा जन्मदिवस. आज त्यांची 125 वी जयंती. त्यानिमित्त…

सिंगापूर येथे “आझाद हिंद सरकार’ची स्थापना, “जयहिंद’ हे अभिवादनाचे शब्द, “चलो दिल्ली’ हे घोषवाक्‍य, तर “कदम कदम बढाये जा’ हे समरगीत भारतीयांच्या मनात अमर आहे. विनम्र, थोर सेनानी, योद्धा, मुत्सद्दी, रणनीती धुरंधर, प्रभावशाली राष्ट्रभक्‍त अशा विविधांगी अंगांनी बहरलेलं, युवा तरुणाईचं उत्तम उदाहरण म्हणजे सुभाषचंद्र बोस.

हिंदुस्थानपाशी “मुक्‍तीसेना’ नाही म्हणून आज आपण स्वतंत्र होऊ शकत नाही, स्वतःपाशी सैन्य होतं म्हणून अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन लढू शकले, इंग्रजांचे वर्चस्व झुगारून अमेरिका स्वतंत्र करू शकले. हीच गोष्ट इटलीच्या गॅरिबाल्डीची. त्यांनी स्वतंत्र स्वयंसेवकदल उभारलं. कमालपाशा यांनी नवा तुर्कस्थान निर्माण केला. तेच भारतासाठी करण्याचा त्यांनी निर्धार केला. “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुँगा’ अशी गर्जना करीत तरुणांना एकत्र केले. ब्रिटिश सरकारविरुद्ध उघडपणे लढण्याची तयारी केली. हिंदुस्थानने आपलं भवितव्य स्वतःच घडवलं पाहिजे. इंग्रजांच्या पुढे आता लाचारी नको, पडेल ती जबाबदारी, कष्ट “स्वतंत्र देश’ म्हणून स्वीकारायला आपण समर्थ आहोत, या सुभाषचंद्र बोस यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत राष्ट्रभक्‍तीचा सार्थ अभिमान होता.

“कटक’ ही सुभाषबाबूंची जन्मभूमी. वडील जानकीदास प्रतिष्ठित वकील, तर आई प्रभादेवी धार्मिकवृत्तीच्या. या दोघांच्या संस्कारातून सुभाषबाबू घडले. सुरुवातीला मिशनरी शाळेत प्रवेश मात्र नंतर मातृभाषेच्या शाळेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 1919 मध्ये “रौलेट ऍक्‍ट’सारख्या काळ्या कायद्याविरुद्ध भारतात ब्रिटीश राजवटीबद्दल असंतोषाचा भडका उडाला. त्यात भर म्हणून 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड घडविले. आंदोलनाची लाट खेडोपाड्यापर्यंत पोचली. सुभाषचंद्र यांनी बड्या नोकरीचा राजीनामा देऊन मायदेशी परतले. मुंबईत महात्मा गांधीजींची भेट घेतली. पुढे सुभाषचंद्र बोस अखिल भारतीय कॉंग्रेसचे दोन वेळा अध्यक्ष झाले.

1939 साली दुसऱ्या महायुद्धाचे वारे युरोपात वाहत होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ही एक संधी होती. या युद्धाचा उपयोग करून घ्यायचा तर सुभाषबाबू तुरुंगात होते. बाहेर पडणे अशक्‍य होते. त्यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केले. ही बातमी बाहेर पसरू नये कारण जनतेचा असंतोष वाढेल, या भीतीने इंग्रज सरकारने त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असलेल्या सुभाषचंद्रांनी त्यांचीच युक्‍ती (आग्य्राहून सुटका) पुनरावृत्ती केली. तब्बेत ढासळल्याचा बहाणा करून, दाढी वाढवून, वेश पालटून पेशावर मार्गे काबूल-अफगाणिस्तान-मॉस्को मार्गे बर्लिनला पोहोचले. हिटलर, मुसोलिनी या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. जपानची मदत मिळाली. त्यांचा सतत 90 दिवसांचा प्रवास सुरू होता. आपली इच्छापूर्ती होणार अशी त्यांना आशा होती. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर बॉंबहल्ला झाला. ही शहरं बेचिराख झाली. नाईलाजाने जपानला शरणागती पत्करावी लागली. यावेळी प्रचंड प्राणहानी झाली.

आझाद हिंद सेना इंफाळच्या दिशेने प्रस्थान करणार होती. आझाद ब्रिगेड, झाशीची राणी रेजिमेंट अशी नावे असलेली सुसज्ज सेना तयार होती. डोळ्यासमोर “स्वतंत्र हिंदुस्थान’चे एकच ध्येय होते. “चलो दिल्ली’ हा एकच नारा देत भारताच्या दिशेने कूच सुरू होती. तेवढ्यात जर्मनी-जपानने बिनशर्त शरणागती पत्करल्याने यापुढे त्यांच्या मदतीची आशा संपली होती. अशा वेळी सुभाषबाबूंनी सैनिकांना धैर्य दिले. “आपण मृत्यूमुखी पडू, पण आता माघारी हटणार नाही. इंग्रजांपुढे शरणागती नाही.’ अशी घोषणा देऊन सैन्यात चैतन्य निर्माण केले. नभोवाणीवरून जनतेला संदेश देताना त्यांचा कंठ दाटून आला. यशाचा अर्धा टप्पा पार केला आहे. पुढचा प्रवास अधिक खडतर आहे. हिंदसेना हिंदुस्थानापर्यंत पोहचू शकत नाही, ही खंत सुभाषबाबूंच्या मनात होती.

“लाख गेले तरी लाखांचा पोशिंदा जाता कामा नये’ या एकाच भावनेने हिंदी-जपानी सैनिकांनी सुभाषबाबूंवर प्रेम केले. नेताजी तुम्ही आमच्यासाठी अनमोल आहात. तुम्ही वाचले पाहिजे, हा त्यांचा निग्रह. नाईलाजाने सैन्याचा निरोप घेऊन सुभाषबाबू रंगूनला निघाले. जपानने बंदोबस्त दिमतीला दिला होता. सित्तांग नदीचा पूल कोसळला होता. बॉंब वर्षाव चालूच होता. कधी मोटार, होडी, तर कधी पायी प्रवास. शत्रू सैन्य केव्हा गाठेल, पकडेल याचा नेम नव्हता. हाताशी आलेला विजय निसटला. विमान दुघर्टनाग्रस्त झाले. अपघात की घातपात, हे गूढच राहिले.

भारत स्वतंत्र झाल्याचे पाहण्याचे भाग्यही त्यांना मिळाले नाही. सुभाषचंद्र बोस यांचे कर्तृत्व भारतीयांच्या अंतःकरणात कायमच वंदनीय राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.