एकाच वेळी दोन पेपर असणाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था
विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येणे होणार शक्य
पुणे – प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी परीक्षा ही डिसेंबर महिन्यात एकाच कालावधीत होत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नेट अथवा विद्यापीठाची परीक्षा एकाचवेळी देता येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षा एकाचवेळी आलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे नंतर विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येणे शक्य होणार आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सीतर्फे “यूजीसी नेट’ची परीक्षा 2 ते 6 डिसेंबरदरम्यान होत आहे. नेट परीक्षा 81 विषयांसाठी होत असून, त्यासाठी 10 लाख 34 हजार 872 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थांना त्यांचे हॉल तिकीट, परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. परंतु, पुणे विद्यापीठाच्या डिसेंबर महिन्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काही परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. “नेट’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने त्याचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षांवर होणार आहे. त्यात विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
नेट परीक्षेच्या कालावधीत ज्या विद्यार्थांचे विद्यापीठाच्या परीक्षेसह नेटची परीक्षा आली आहे, अशा विद्यार्थांनी त्यांच्या नेटच्या परीक्षेचे हॉल तिकीट व इतर कागदपत्रे महाविद्यालयाच्या माध्यमातून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे सादर करावीत. अशा विद्यार्थांनी नेटची परीक्षा द्यावी व विद्यापीठाच्या परीक्षेसाठी त्यानंतर विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत, अशाच विद्यार्थ्यांसाठी ही सवलत राहील. त्यांनी नेटच्या परीक्षेच्या किमान दोन दिवस आधी सर्व कागदपत्र विद्यापीठाकडे सादर करावीत, त्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल. मात्र, अन्य विद्यार्थांची परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होतील.
– डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ