खेळाडूंची घुसमट, प्रशिक्षकांची उपासमार

पाच महिन्यांपासून मैदाने बंद : क्रीडा क्षेत्राला कधी मिळणार मोकळीक

पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैदाने बंद करण्यात आली यामुळे शहरातील खेळाडूंची घरात बसून घुसमट होत आहे. तर, खेळ प्रशिक्षकांना उपजीविकेचे साधनच बंद पडल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील हॉटेल, मॉल्स सुरु करण्यास प्रशासनाकडून मुभा दिली आहे. मात्र, खेळाडूंना मैदानावर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने खेळप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. हा कार्यकाळ सुमारे 5 महिने जैसे थे होता. मात्र, आता टप्प्या-टप्प्याने टाळेबंदीच्या अटी शिथिल केल्या जात आहेत. त्यात व्यावसायिक गोष्टींना प्राधान्य दिले जात असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, क्रीडा क्षेत्राला अजूनही मोकळीक मिळाली नसल्याने खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एरवी कधीच एका जागी न बसणारे खेळाडू पाच महिने घरात बसून असल्याने त्यांना शारिरिक व मानसिक त्रास होत असल्याचे खेळाडू सांगत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे 21 मैदाने आहेत. परंतु त्यांना खुले करण्यास परवानगी मिळत नसल्याने खेळाडू हैराण आहेत. तर, खेळाडूंना प्रशिक्षण देऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या प्रशिक्षकांना उत्पन्नाचे काहीच साधन उरले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत महापालिका प्रशासन व राज्य शासनाने विचार करावा असे खेळाडूंचे म्हणणे आहे.

करोनाच्या काळात प्रशासनाकडे सरसकट मैदाने सुरू करावीत, असे म्हणणे चुकीचे आहे. यानिमित्ताने ऑनलाइन पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची एक संधी म्हणून बघितले पाहिजे. मात्र, व्यावसायिक खेळाडूंसाठी किंवा मोठ्या स्पर्धेतील खेळाडूंना शहरातील काही निवडक मैदानावर ओळखपत्रे बघून सराव करण्यास परवानगी देण्याचा प्रयत्न करायला हवा.
– अमोल बुचडे, हिंद केसरी किताब विजेते


गेल्या पाच महिन्यांपासून मैदाने बंद असल्याने खेळाडूंना बाहेर पडता येत नाही. यामुळे प्रशिक्षकांचे उत्पन्नाचे साधन बंद पडले आहे. आधीच अल्प पैसे मिळतात. त्यात, लॉकडाऊनमुळे अधिक अडचणी वाढल्या आहेत. बचत केलेल्या थोड्याफार पैशांमधून प्रशिक्षकांचा कसा-बसा उदरनिर्वाह होत आहे. परंतु असे किती दिवस चालणार?
– योगेश गोलांडे, प्रशिक्षक, लॉन टेनिस

Leave A Reply

Your email address will not be published.