काठमांडू – नेपाळमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीत आजही पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि त्यांचे विरोधक नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यातील मतभेद मिटवण्यात अपयश आले.
पंतप्रधान ओली यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक झाली. त्यात कोणताही राजकीय निर्णय झाला नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या निवासस्थानीच कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीची अल्पकाळासाठी बैठक झाली. ओली आणि प्रचंड यांच्यात नेतृत्वावरून वाद आहेत.
ओली यांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना राजीनामा देण्याची सूचना पक्षाने केली होती, पण त्यावर अंतिम निर्णय मात्र होऊ शकला नाही. हा निर्णय घेण्यासाठीच आज ही बैठक बोलावण्यात आली होती.
या आधीही स्थायी समितीची बैठक सात वेळा अनिर्णित राहिली होती. पक्षाच्या स्थायी समितीची पुढील बैठक 28 जुलै रोजी व्हायची आहे, त्यात पंतप्रधानांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.