कालापानीबाबत नेपाळच्या दाव्याला आधार नाही

भारतीय अभ्यासकांनी दिले पुरातन काळातील दस्तऐवजांचे दाखले

पिथोरगड (उत्तराखंड) – नेपाळने कालापानी हा भाग आपल्या नकाशामध्ये दाखवला असला तरी उत्तराखंडमधील काही अभ्यासकांनी शिलालेख आणि ऐतिहासिक पुस्तकांमधील माहितीच्या आधारे या दाव्याला कोणताही आधार नसल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्यापूर्वी लिहीलेल्या काही पुस्तकांमध्ये कालापानी हा भाग काली नदीचा उगम असलेला दर्शवलेले आहे, या भागावर भारताचा दावा सिद्ध करणारा हा महत्वाचा भाग उजेडात आणण्यात आला आहे.

नेपाळच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने शनिवारी नवीन आणि वादग्रस्त नकाशाला अधिकृतपणे स्वीकारण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे नव्या विषयाला तोंड फुटले आहे. नेपाळचा नवीन नकाशा सीमेच्या कडेला असलेल्या कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधूरावर हक्क सांगत आहे. मात्र या भागावर भारताचा पहिल्यापासूनच दावा आहे. काली नदी दोन्ही बाजूंनी सीमा म्हणून ओळखली जाते.

मात्र या नदीचा उगम कालापानीमध्ये असल्याचे नेपाळला मान्य नाही. या नदीचा उगम महाकाली असून तो कौटी यांग्ती ओढ्यात आहे. या ओढ्याचा उगम लिंपियाधुरामध्ये आहे. म्हणूनच या भागातील अधिक भूभाग नेपाळचा असल्याचे नेपाळमधील बुद्धीवंतांचे म्हणणे आहे.

अल्मोडा येथील कुमाऊँ विद्यापीठाच्या एसएस जीना कॅम्पसमधील इतिहासाचे प्राध्यापक व्ही.डी.एस.नेगी यांनी स्कंद पुराणातील मानस खंडाचा संदर्भ दिला आहे. त्यामध्ये काली नदीचा संदर्भ आहे, त्याला प्राचीन काळी श्‍यामा म्हणून ओळखले जात असे. स्कंद पुराणाची रचना सागुती कराराच्या कित्येक शतके पूर्वी 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात केली गेली. तिबेटला जाणारे ब्रिटीश प्रवाशांनी आणि भारतीय अभ्यासकांनी कैलास मानसरोवराबाबतच्या लेखनामध्येही कालापानीचा उल्लेख काली नदीचा उगमस्रोत म्हणूनच केला असल्याचे नेगी यांनी सांगितले. ब्रिटीश लेखक चार्ल्स शिरींगनेही कालापानीला काली नदीचा उगम म्हटले आहे. या भागातील डझनभर जलस्रोत कालीमध्ये मिळतात.

कैलास मानसरोवर यात्रेवर 1949 मध्ये सविस्तर पुस्तक लिहीलेल्या स्वामी प्रणवानंदांनीही कालापानीला काली नदीचा उगम मानले असल्याचा दाखला नेगी यांनी दिला आहे.
व्यास खोऱ्यातील आदिवासी 6 व्या शतकापासून लिपुलेख खिंडीतून तिबेटबरोबर व्यापार करीत असत. मात्र या मार्गाने नेपाळी व्यापारासाठी प्रवास करत असल्याचा पुरावा उपलब्ध नाही, असे कुमाऊँ विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख अजय रावत यांनीही म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.