नवी दिल्ली : कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा हे नेपाळचेच प्रदेश असून ते आपल्या नकाशात सामिल करण्याचा निर्णय नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर भारताकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. नेपाळने भारताच्या सार्वभौमत्नाचा सन्मान करावा, असा सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. नेपाळने असे बनावट कार्टोग्राफिक तयार करू नये, तसेच भारताच्या अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली.
नेपाळनेआपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असेही सरकारकडून सांगण्यात आले. कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत सामिल केले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला होता.
तसेच यापूर्वी भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता नेपाळ लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीनंतर हा नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.