Nepal Cricket Team At NCA : बीसीसीआय अफगाणिस्तान क्रिकेट संघाला नेहमीच मदत करते. यामुळेच अफगाणिस्तान बोर्डाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी चांगली मैत्री आहे. अफगाणिस्तान संघाचे घरचे मैदान भारतात आहे. ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौ ही अफगाणिस्तान संघाची घरची मैदाने आहेत. अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटी ही नोएडा येथे खेळणार आहे. अफगाणिस्ताननंतर आता बोर्डाने नेपाळ क्रिकेटसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
खरं तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा करून शेजारील देश नेपाळच्या संघाला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी नेपाळ क्रिकेट संघाला बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. शाह यांनी नेपाळ संघाला एनसीएमध्ये पूर्ण दोन आठवडे सराव करण्याची परवानगी दिली आहे, जिथे नेपाळचे नवोदित क्रिकेटपटू गरज पडल्यास दुखापत व्यवस्थापन आणि पुनर्वसनासाठी जाऊ शकतात.
नेपाळचा पुरुष क्रिकेट संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करणार आहे. हे प्रशिक्षण दोन आठवड्यांचे असेल. वास्तविक, या प्रशिक्षणादरम्यान, नेपाळी खेळाडू आयसीसी पुरुष क्रिकेट विश्व लीग-2 सामन्यांसाठी स्वत:ला तयार करतील. यासंदर्भात क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमचा संघ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्व लीग-2 साठी सज्ज आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी आमचे खेळाडू भारतात रवाना झाले आहेत. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील प्रशिक्षणामुळे आमच्या खेळाडूंचे कौशल्य आणि रणनीती सुधारेल, चला त्यांना शुभेच्छा देऊया.”
🏏 #Rhinos are off to India @BCCI to gear up for the ICC Men’s Cricket World Cup League 2 Preparation Series! 🇳🇵✈️
Training at the National Cricket Academy (NCA) in Bangalore for two weeks will sharpen our players’ skills and strategies. 💪🏽🏟️
Let’s wish them all the best! 🌟… pic.twitter.com/BW2e08rKPT
— CAN (@CricketNep) August 12, 2024
त्याचबरोबर नेपाळ क्रिकेट संघाचे खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर कॅनडाला रवाना होतील. आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड लीग-2 स्पर्धा कॅनडामध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत नेपाळशिवाय ओमानसारखे संघही असतील.
नेपाळचा संघ : रोहित पौडेल (कर्ंधर), आसिफ शेख, कुशल भुरटेल, सोमपाल कामी, ललित राजबंशी, सूर्या तमांग, देव खनाल, आरिफ शेख, करण केसी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग ऐरी, अनिल शाह, भीम शर्की, कुशल मल्ला, आकाश चंद, रिजन ढकल, संदीप जोरा, अर्जुन सौद, कमल सिंग ऐरी, सागर ढकल, बसीर अहमद आणि संदीप लामिछाने.
बीसीसीआय नेपाळ क्रिकेटला करत आहे सतत मदत …
यापूर्वी मार्चमध्ये बीसीसीआयने फ्रेंडशिप कपचे आयोजन केले होते. या त्रिकोणी मालिकेत नेपाळशिवाय गुजरात आणि बडोदाचे संघ होते. या स्पर्धेतील गट टप्प्यातील सामन्यांमध्ये नेपाळला दोन्ही संघांविरुद्ध 2-2 वेळा खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आता नेपाळ क्रिकेट संघाच्या खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये खेळाडूंना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, तर बंगळुरूमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये भारतीय खेळाडूंसाठी जास्तीत जास्त व्यवस्था उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआय सचिव शाह यांनी आपल्या शेजारील देशातील उदयोन्मुख खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, याआधी नेपाळ संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची तयारी म्हणून दिल्लीत सराव केला होता. कारण काठमांडूमध्ये हवामान चांगले नव्हते.