मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
संगमनेर – संगमनेरमध्ये चार जणांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असतानाही नेपाळमधील तबलिग जमातीच्या 14 जणांचे संगमनेरमध्ये वास्तव्य असल्याचे उघडकीस आले. धार्मिक स्थळासह घरामध्ये वास्तव्यास ठेवल्याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हाजी जलीमखान कासामखान पठाण, हाजी शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनवी शेख (सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नावे आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा पोलीस नाईक सलीम रमजान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नेपाळमधील तबलिग जमातीच्या 14 जणांना शहरातील एका धार्मिकस्थळात व नंतर रहेमतनगर गल्ली क्रमांक दोन येथे वास्तव्यास ठेवले.
या 14 जणांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी सांगितले. दरम्यान संगमनेर शहरातील नायकवाडपुरा, लखमीपुरा, बागवानपुरा व ग्रामीण भागातील आश्वी बुद्रुक, हिवरगाव पावसा या भागातील 15 जणांना सोमवारी प्रशासनाने ताब्यात घेतले होते. यातील नायकवाडपुरा येथील तिघांना तर आश्वी बुद्रुक येथील एकाला असे चौघांजणांना करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. संगमनेरात एकीकडे करोनाचे संकट घोंगावत असताना हे नेपाळमधील तबलिग जमातीचे 14 जण शहरात आले कसे, असा प्रश्न निर्माण पडला आहे.