महाराष्ट्र हळहळला: महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 27 ठार

Nepal Bus Accident: महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या अपघातात 27 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. 31 जण जखमी आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात असताना ही घटना घडली. बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील भुसावळचे रहिवासी होते.
तनहुन जिल्ह्यातील आयना पहाडा येथे सकाळी 11.30 वाजता ती महामार्गावरून 500 फूट खाली नदीत पडली. सर्वजण नेपाळला फिरायला गेले होते. नेपाळ पोलिस, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ आर्मी शोध आणि बचाव कार्य करत आहेत. घटनास्थळी सशस्त्र पोलिस दलाच्या (एपीएफ) 45 जवानांची एक तुकडीही उपस्थित आहे. नेपाळ लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तनहुनकडे रवाना झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाराजगंज एसडीएमला घटनास्थळी पाठवले आहे.
अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. बसचा क्रमांक UP-53 FT 7623 आहे. सुमारे 4 महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या 3 बसेस महाराष्ट्रातून बुक केल्या होत्या. सुमारे 110 लोकांना घेऊन तीन बस 20 ऑगस्ट रोजी नेपाळला पोहोचल्या. या बसेस 29 ऑगस्टला परतणार होत्या.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट –
या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले आहे. यातील बहुतांश भाविक जळगावचे असून जळगावचे जिल्हाधिकारी यूपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळें यांचे ट्विट –
नेपाळमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील नागरीकांना प्राण गमावावे लागले. हि अतिशय दुर्दैवी आणि दुःखद बातमी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेतील जखमी व्यक्ती सुखरूप घरी परत याव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना.






