पुणे, दि. 28 -शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यानुसार उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) उभारण्यात येणार होता. तब्बल 35 वर्षांनंतर या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असताना आता या मार्गाऐवजी महापालिकेकडून निओ मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठीचा आराखडा महामेट्रोने तयार केला असून, तो पालिकेस सादर केला आहे. मेट्रोप्रमाणेच पूर्णत: उन्नत (खांबाच्या वरून) हा मार्ग असणार असून, ही मेट्रो सेवा 44 किलोमीटरची असेल. त्यासाठी 5 हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.
मुळातच आधी हा वर्तुळाकार रस्ता शहरातील खासगी वाहनांसाठी उभारला जाणार होता. मात्र याच रस्त्यावर निओ मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो सुरू झाल्यास स्वतःची वाहने सोडून खरंच नागरिक तिचा वापर करतील का, हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे निओ मेट्रोचे नियोजन फसल्यास महापालिकेसाठी हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार आहे.
“निओ मेट्रो’ साकारल्यास पुण्यात देशातील हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये या प्रकल्पासाठी हालचाली झाल्या होत्या. पण केंद्राने त्याला मंजुरी दिली नाही. शहरात आधीच मेट्रोचे खांब असल्याने अनेक भागात ही निओ मेट्रो मेट्रोच्या मार्गाच्याही वर असणार असून, अनेक भागात त्याची उंची जमिनीपासून सुमारे 40 मीटर असणार आहे. काही भागात 12 मीटर रस्त्यावर याचे खांब असणार आहेत. तर एकूण मेट्रो मार्गात जवळपास 10 ठिकाणी हा निओचा मार्ग मेट्रो मार्गाला छेदणार आहे.
काय होता “एचसीएमटीआर’ प्रकल्प?
शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) हा शहराच्या हद्दीतून जाणारा 36 किलोमीटर चा वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्यावरील सहा लेनपैकी मध्य भागातील दोन लेन बीआरटीसाठी तर उर्वरित चार लेन मोटार व अन्य अवजड वाहनांसाठी होत्या. एलिव्हेटेड पद्धतीने बनविण्यात येणार असलेल्या, 24 मीटर रुंदीच्या या रस्त्यावर बीआरटीसाठी 36 स्थानके उभारण्यात येणार होती. हा रस्ता मेट्रोच्या मार्गांनाही जोडण्यात येणार होता. हा संपूर्ण प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांचा होता. या मार्गावर 27 ठिकाणी रॅम्प उभारण्यात येणार होते. तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा मार्ग होता. त्यामुळे वाहनचालकांना सहज शहराच्या कोणत्याही भागात जाणे शक्य असल्याचा महापालिकेचाच दावा होता.
अशी असेल निओ मेट्रो…
निओ मेट्रो ही मेट्रोप्रमाणेच असून, तिचे टायर रबरचे आहेत.
त्यामुळे ती वजनाला हलकी असते.
मेट्रोप्रमाणेच खांब उभारून त्यावरून मार्ग करून 8 मीटरचा रस्ता केला जातो.
दोन लेनमधून मेट्रोचे डबे धावतात.
या मेट्रो मार्गाची क्षमता दहा ते 12 टन वजन पेलण्याची असते. सुमारे 44 किमीचा हा मेट्रो मार्ग असणार
43 स्थानके असणार