हॅमिल्टन – न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज निल वॅगनर याने पायाच्या अंगठ्याला दुखापतीनंतरही तब्बल 49 षटकांची गोलंदजी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत वॅगनरने ही कमाल केल्याने त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 101 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन अफ्रिदीचा यॉर्कर चेंडू नीलच्या पायाला लागला. यामुळे त्याच्या अंगठ्याला मोठी दुखापत झाली. मात्र, त्याने या दुखापतीसह पहिल्या डावात 21 तर, दुसऱ्या डावात 28 अशी तब्बल 49 षटके गोलंदाजी केली.
इतकेच नव्हे तर त्याने 4 गडीही बाद केले. नीलने पेन किलरचे इंजेक्शन घेतले आणि गोलंदाजी केली. दुखापत असताना देखील त्याने शानदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने दुसऱ्या डावात पाकचा शतकवीर फवाद आलमला बाद केले. गोलंदाजी करत असताना तो वारंवार मैदानाबाहेर जात होता आणि इंजेक्शन घेऊन परत गोलंदाजीसाठी येत होता.