मुंबई – विक्रांत जहाज वाचवण्यासाठी पैसा जमवून त्याचा अपहार केल्याचा आरोप असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपुर्व जामीन अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
काल किरीट सोमय्या यांचा अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी त्यांच्या पुत्राचा अर्ज फेटाळण्यात आल्याने सोमय्या कुटुंबाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. विक्रांत साठी सोमय्या पितापुत्रांनी 58 कोटी रूपयांचा निधी जमवून तो हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे पैसे राजभवनात सादर केले जातील असे सोमय्या यांनी आधी म्हटले होते.
तथापि त्यांनी एक रूपयाही राजभवनावर जमा केलेला नाही असा खुलासा राजभवनाकडून झाल्यानंतर सोमय्या यांच्या वकिलांनी हा निधी भाजप कार्यालयात जमा केल्याचे कोर्टापुढे सांगितले आहे.
दरम्यान स्वत: सोमय्या मात्र अजूनही नॉटरिचेबल आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. तथापि आज त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ संदेश जारी करून पुन्हा शिवसेनेवरच तोफ डागली आहे. सरकार मधील भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही असे त्यांनी त्यात म्हटले आहे.