अबाऊट टर्न: शेजारी

हिमांशू

“निंदकाचे घर असावे शेजारी,’ असे संत तुकोबारायांनी सांगितले, त्याची सामान्यतः दोन कारणे निरूपणकार सांगतात. एक म्हणजे निंदा करणारा गृहस्थ सतत शेजारी राहत असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला आपले दोष कळतात आणि आपण स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. दुसरा पदर असा की, आपल्या शेजारपाजारचे सतत आपली निंदा करत असतील, तर आपल्याला आपली वाटचाल योग्य दिशेने चाललीय, हेही समजू शकते. कारण आपले चांगले झालेले न बघवणारे लोक सामान्यतः आपल्या भोवतालीच असतात. आता हेच पाहा ना, “दिवार’ चित्रपटात “मेरे पास बंगला है…’ वगैरे थाटात सांगणारे महानायक अमिताभ बच्चन आज त्याच बंगल्याच्या एका “दिवार’मुळे शेजाऱ्यांच्या टीकेचे धनी बनावेत, हे दुर्दैवच नव्हे का? निंदकाचे घर शेजारी असणे चांगले; पण तरी दोघांमध्ये “दिवार’ असणे म्हणजे कटकटच ना? संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माउलींचे नाव ज्याला दिले गेले, असा जुहूमधला रस्ता मूळचा 45 फुटांचा.

ट्रॅफिक वाढल्यामुळे तो 60 फुटांचा करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून आहे. या विस्तारीकरणासाठी बिग बी यांच्याबरोबरच के. व्ही. सत्यमूर्ती या उद्योजकाचीही खासगी जागा संपादित करण्याचे ठरले. नोटीस मिळताच सत्यमूर्ती कोर्टात गेले. त्यांना मनाई हुकूम द्यायला कोर्टाने नकार दिला आणि त्यांच्या “सत्यमूर्ती रेसिडेन्सी’ची संरक्षक भिंत पालिकेने गेल्या गुरुवारी पाडून टाकली.

एवढे झाल्यानंतर बिग बी यांच्या “प्रतीक्षा’ बंगल्याचीही भिंत पडणार, हे निश्‍चित मानले गेले. भिंतीवर मार्किंगसुद्धा केलंय म्हणे! परंतु कोर्टात न जातासुद्धा पालिकेने त्यांना मात्र एक महिन्याची मुदत देऊ केली, तेव्हा शेजारीपाजाऱ्यांना कसा विचार करावा, हेच कळेना. पालिका स्वतः भिंतीला हात लावणार नाही, असे परिसरातल्या नागरिकांना वाटतंय. वाटले तर वाटू दे! असे निंदक शेजारीपाजारी असणारच! लोकप्रियता कुणाला बघवते? अहो, इवल्याशा तैमूरचे सगळीकडून कौतुक होते, तेही कुणाला बघवत नाही. आठवला ना? अहो, करिना आणि सैफ अली खानचा मुलगा. त्याच्या नावाने चॉकलेटं निघाली, खेळणी निघाली… सतत त्याच्या बातम्या वाहिन्यांवर दाखवल्या जातात.

“स्टारकिड’ अशी ओळख त्याला मिळाली, हे नाकारून कसं चालेल? अर्थात, त्याचा एवढा उदो-उदो कुणालाच सहन होत नाही. सोशल मीडियावर तर लोक नको-नको ते बोलतात. अहो, ज्याला अजून बोलतासुद्धा येत नाही, त्याला जर आई-बापामुळे जन्मापासून (किंवा त्याही आधीपासून) प्रसिद्धी मिळत असेल, तर लोकांचे काय जाते? बोलता येते म्हणून बोलतात लोक. तैमूर बोलायला लागला म्हणजे सगळ्यांची बोलती बंद करेल, असे त्याच्या आईवडिलांना वाटणारच! सेलिब्रिटी सामान्यतः शांत वसाहतीत राहतात. त्यांचे शेजारीही शांततेच्या शोधार्थच तिथे आलेले असतात. पण तैमूरच्या अतिकौतुकामुळे म्हणे कॉलनीची शांतता भंग पावते, अशी शेजाऱ्यांची तक्रार आहे.

मीडियाची माणसे सारखी सैफ-करिनाच्या घराबाहेर उभी असतात. त्यांचा त्रास झाल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी पत्रकारांना हकलले. असे असतात शेजारी! अस्सल निंदक! कुणाचं चांगले पाहवेल तर शपथ! अर्थात, हे कोणत्या प्रकारचे निंदक हे केवळ तुकोबांनाच ठाऊक… किंवा निरूपणकारांना!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.