नवी दिल्ली : बँकांना चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. या विनंतीनंतर निहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली. अमेरिकन न्याय विभागाने अटकेची पुष्टी केली आहे.
न्यूयॉर्कमध्येही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. निहालवर २.६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता निहालचे भारतात प्रत्यार्पण केले जाईल. निहाल मोदीला १७ जुलै रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या जामीनाला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. निहालवर पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित १३,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.
हा घोटाळा नीरव, निहाल आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांनी केला होता. नीरव सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. निहालच नीरवच्या गुन्हेगारी संपत्तीचा पांढरा पैसा करत होता. त्याच्याविरुद्ध बनावट कंपन्या तयार करणे आणि परदेशी व्यवहारांच्या नावाखाली काळा पैसा लपवणे आणि हाताळणे यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात निहालवर पुरावे नष्ट करणे आणि नीरवला त्याच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये जाणूनबुजून मदत करणे असा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, पंजाब नॅशनल बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, निहालने नीरवचा जवळचा सहकारी मिहिर आर भन्साळी याच्यासोबत दुबईतून ५० किलो सोने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली होती.