…म्हणून नेहा म्हणते, महिलेला पाच बॉयफ्रेंड असणं हा तिचा चॉईस…

अभिनेत्री नेहा धुपिया गेला काही काळ प्रसिद्धीपासून दूर होती. काही अपवाद वगळता ती कुठेही फारशी सक्रिय नसल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता ती चांगलीच चर्चेत आली असून तिच्या एका वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

नेहा ‘एमटीव्ही रोडीज’ या प्रसिद्ध कार्यक्रमात जज म्हणून भूमिका निभावत आहे. या कार्यक्रमात तिचा एका स्पर्धकाशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने केलेल्या भाष्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे आपल्यासह अजून पाच जणांशी एकाच वेळी प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याने त्या पाचही जणांना आणि प्रेयसीला एकत्र बोलवून तिला श्रीमुखात भडकवल्याचंही सांगितलं. यावर नेहा धुपिया हिने अपशब्द वापरून या तरुणाला चांगलंच सुनावलं. तिच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या महिलेला पाच बॉयफ्रेंड असणं हा तिचा चॉईस असू शकतो, त्यासाठी तू तिच्यावर हात उगारणं योग्य नव्हतं, असं नेहा म्हणाली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. नेहा ही अत्यंत दांभिक स्त्रीवादी असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तर काहींनी याच कार्यक्रमाचे आधीचे काही भाग दाखवून नेहा त्या भागांत आपल्या बॉयफ्रेंड्‌सना मारणाऱ्या तरुणीची स्तुती करत असल्याचं म्हटलं आहे.

या ट्रोलिंगवर अद्याप नेहाने कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, यानंतर एमटीव्ही रोडीजसारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.या शोवर बंदी आणण्याची मागणी झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 17 वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचं वेड अवघ्या तरुणाईला लागलं होतं.

या कार्यक्रमाची मूळ संकल्पना रघु राम आणि राजीव लक्ष्मण या भावांची होती. जवळपास दहा वर्षं हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर होता. मात्र, शिवराळ भाषा आणि आक्षेपार्ह आशय यांमुळे यापूर्वीही हा कार्यक्रम बंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.