नारायणगाव -नारायणगाव (ता. जुन्नर) येथील डॉक्टर मते हॉस्पिटल मधील डॉक्टर अजय धोंडीभाऊ मते यांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकलेला पाय चक्क कचरा गाडीत फेकून दिल्याची संतापजनक व डॉक्टरी पेशाला न शोभणारी घटना घडली असून डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायणगाव येथील डॉक्टर मते हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासून 81 वर्षांची ज्येष्ठ व्यक्ती उपचार घेत होती. उपचारादरम्यान पेशंटच्या पायात गॅंगरीन झाल्यामुळे डॉ. मते यांनी गुडघ्याच्या खाली पाय कट करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर कापलेल्या व गॅंगरीन झालेल्या पायाची साथीचा रोग पसरू नये म्हणून, योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे होते; परंतु डॉ. अजय मते यांच्या निष्काळजीपणामुळे व संसर्गजन्य रोग पसरू शकतो याची जाणीव असताना देखील
दवाखान्यातील मावशी सुनिता जाधव यांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकलेला पाय बुधवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत फेकून दिला.
डॉ. अजय मते यांनी केलेल्या या अमानवीय कृत्यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. वास्तविक कुठल्याही डॉक्टरांना हॉस्पिटलमधील कचरा अथवा जैविक कचरा हा सार्वजनिक ठिकाणी टाकता येत नाही.
त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे हॉस्पिटलचे काम असते; परंतु केवळ डॉक्टरांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे हे कृत्य घडले. त्यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.