fbpx

पोस्ट कोविड सेंटर उभारणीकडे दुर्लक्ष; पालिका प्रशासनाचा अभद्रपणा

  • आयुक्तांची घोषणा हवेत विरली; पुन्हा त्रास सुरू झाल्यावर रुग्णांची होतेयं धावपळ

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या 90 हजाराच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत शहरामध्ये 90 हजार 289 जणांना करोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांचा आलेख पुन्हा चढत्या दिशेने सुरू झाला आहे. करोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी दक्ष राहणे आवश्‍यक आहे. शहरामध्ये सद्यस्थितीत 86 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र त्यांतील बहुतांश रुग्णांना श्‍वसनाविषयीच्या तक्रारी जाणवत आहेत. या रुग्णांसाठी शहरामध्ये अद्याप एकही पोस्ट कोविड सेंटर सुरू केले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे पोस्ट कोविड सेंटर उभारण्याची आयुक्तांनी केलेली घोषणाही हवेतच विरली आहे.

शहरात करोना रुग्णांचा आकडा 90 हजार झाला आहे. यातील 86 हजार रुग्ण बरे झाले आहेत. प्राथमिक लक्षणे असतानाच रुग्णांनी करोनाची चाचणी करून वेळीच उपचार घेतल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. परंतु अनेक जण सर्दी, खोकला हे व्हायरल इन्फेक्‍शन असेल अशा समजुतीतून डॉक्‍टरांचा सल्ला न घेता दुखणे अंगावर काढत आहेत. श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागला व प्रकृती चिंताजनक झाल्यानंतरच रुग्ण दवाखान्यात तपासणीसाठी जात आहेत. अशा क्रिटिकल रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेटिंलेटरवर ठेवून उपचार करावे लागतात.

रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेल्यानंतर काही दिवसांनी रुग्णांना श्वसनासह काही इतर आजार जाणवू लागले आहेत. याचे मुख्यत्वे कारण हे उशिराने उपचार घेणे असल्याचे तज्ञ डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना पायऱ्या चढताना किंवा चालताना धाप लागत आहे. तसेच त्यांच्यामध्ये कमालीचा अशक्तपणा येत आहे. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, इतर आजार व ज्यांचे वय जास्त आहे त्यांना करोनातून बरे झाल्यानंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्याची वेळ येत आहे. अशा रुग्णांना कोविड नंतर होत असलेल्या त्रासाबाबत व येणाऱ्या समस्यांवर उपाचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय पोस्ट कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले होते.

मात्र अद्याप त्या ठिकाणी पोस्ट कोविड सेंटर सुरू झाले नाही. करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा काही समस्या उद्‌भवल्यास उपचारासाठी मशिनरीची आवश्‍यकता असते. मात्र अद्याप पिंपरी चिंचवड महापालिकेने या मशिनरी उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यासाठी महापालिका सीएसआर फंडातून ते मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी शहरामध्ये एकही पोस्ट कोविड सेंटर सुरू नसून त्याच्या उभारणीकडे पालिका प्रशासनाने केलेले दूर्लक्ष नागरिकांमध्ये नाराजीचा विषय बनला आहे.

काय त्रास होतो
कोविड विषाणूच्या संसर्गातून पूर्णपणे मुक्त झालेल्या व्यक्तीला त्यानंतरही काही दिवस त्रास होतो. अनेकांना सारखा थकवा आल्यासारखे वाटते. अशक्तपणा येतो. जेवण करण्याची इच्छा कमी होते. तर काहींना श्‍वसनाचा तर काहींना खोकल्याचा त्रास होतो. बऱ्याच रुग्णांना इतर आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. चालताना धाप लागत असल्याचेही अनेकांनी सांगितले आहे.

शहरात आतापर्यंत बाधित – 90,289
बरे झालेले रुग्ण – 86,998
उपचार सुरु – 1709

आयुक्तांची घोषणा हवेतच
शहरातील बरे झालेल्या रुग्णांना होत असलेल्या त्रासामुळे पोस्ट कोविड सेंटर उभारण्याची घोषणा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली होती. 1 नोव्हेंबरच्या दरम्यान पोस्ट कोविड सेंटर उभारले जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या घोषणेला आता महिनाभराचा कालावधी होत आला असताना पोस्ट कोविड सेंटरसंदर्भात कोणत्याच हालचाली सुरू नसल्यामुळे आयुक्तांची घोषणा हवेतच विरल्याचे मानले जात आहे.

वायसीएम रुग्णालयामध्ये अद्याप पोस्ट कोविड सेंटर सुरू झालेले नाही. रुग्णांच्या उपचासाठी काही मशिनरींची आवश्‍यकता असते. त्या मशिनरी सीएसआर फंडातून मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. करोनाचे उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण पुन्हा उपचारासाठी येतात. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर रुग्णालयातीलच आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत अशा दोन रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील जम्बो रुग्णालय आणि ऑटो कल्स्टर येथेही अशा रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.