पुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष

इतिहास प्रेमी मंडळाची खंत : नागरिकांनाही आवाहन

पुणे – हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा पुणे शहराला आहे. मात्र सरकारी पातळीवर त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याची खंत जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने इतिहास प्रेमी मंडळाकडून व्यक्त करण्यात आली.

18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचपार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या शहरातील वारशाची स्थिती मात्र बिकट असल्याची खंत इतिहास प्रेमी मंडळाकडून करण्यात आली. शहराला अनेक वाडे, मंदिरे, संग्रहालये आदी ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा आहे. ऐतिहासिक स्थानांप्रमाणे शहरातील भौगोलिक विशेषताही महत्त्वाची आहे. या वारशांचे स्थळ शहरामध्ये वेगाने होणाऱ्या विकासामध्ये नष्ट होणार नाहीत, यासाठी नागरिकांनी देखील वारशाचे जतन केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

शहरातील नागेश्‍वर, केदारेश्‍वर, त्रिशुंड गणपती, जुना काळ भैरवनाथ आदी प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्‍वर लेणी या ठिकाणांची जाहिरात करून, ऐतिहासिक ठिकाणांची माहितीपत्रके आणि गाईड उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. यासह कसबा पेठेमध्ये असणाऱ्या हिस्सार किल्ला आणि तटबंदीच्या अवशेषांचे रक्षण करावे, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

केवळ ऐतिहासिक वास्तूच नव्हे तर शहरातील विविध व्यवसाय, दागिने, जुन्या पोषाख पद्धती, वाद्ये आदींची जपणूक करावी. त्याचबरोबर शहरात होऊन गेलेल्या क्रांतीकारक, साहित्यिक, कलाकार आदींच्या निवासस्थानावरील माहिती फलक व्यवस्थित लावण्यात यावेत. शहरातील वारसा तज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन करून वारसा जतनासंदर्भात विविध विषयांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासह शहराच्या वारसा संवर्धनासाठी शासनाने आणि नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.