कोपरगावातील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह

कोपरगाव  (प्रतिनिधी) – शहरातील लक्ष्मीनगर भागातील एका महिला करोनाबाधित आढळली. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील कुटुंबातील सात व इतर 13 व्यक्तींना संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्याने कोपरगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शहरातील लक्ष्मीनगर भागातील 60 वर्षीय महिला कोणा बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आरोग्य यंत्रणा सज्ज असल्यामुळे सदर महिलेस एक दिवस आधीच नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली होती.

सदर महिलेच्या घरातील सात सदस्य, तसेच त्यांचा मित्र परिवार व दूध विक्रेता, तसेच एक फायनान्स कंपनीचा इसम सदर महिलेच्या संपर्कात आल्याने अशा 18 जणांना देखील चाचणीसाठी शनिवारी नगर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तेराही जणांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झालाअसून, ते सर्वजण करोना निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान पाच जणांचा चाचणी अहवाल अजूनही येणे बाकी आहे. शहरात करोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, प्रशासनाकडून तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान कोरणा विषाणू रुग्णांमध्ये वाढ झाली, तर आत्मा मालिक हॉस्पिटलच्या मागे असलेले वसतिगृह ताब्यात घेण्याची शासनाने तयारी सुरू केली आहे.

तसेच गौतम पब्लिक स्कूल येथील वसतिगृह देखील शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान आमदार आशुतोष काळे, तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे, विवेक कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी नागरिकांशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तालुका सज्ज आहे, असे एकंदरीत तयारीवरून दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.