‘नीट’चा निकाल 56 टक्‍के; शोएब आफताब देशात पहिला

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम्‌ एन्टरन्स टेस्ट अर्थात “नीट’ परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओडिशाचा शोएब आफताब हा देशात टॉपर आला असून त्याने 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. महाराष्ट्रातून आशिष झानत्ये हा पहिला आला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सायंकाळी साडेपाच वाजता “नीट’चा निकाल जाहीर करण्यात येत असल्याचे ट्‌विट करीत सांगितले. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) देशभरात दि. 13 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. हा निकाल जाहीर करण्यापूर्वी “एनटीए’ने नीट परीक्षेची उत्तरसूची जाहीर केली होती. त्यामुळे “नीट’चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

“नीट’साठी 15 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 13 लाख 66 हजार 945 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 7 लाख 71 हजार 500 इतके म्हणजेच 56.44 टक्‍के विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले. महाराष्ट्रातून नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 95 हजार 338 इतकी आहे. त्यातून 79 हजार 974 विद्यार्थी पात्र ठरले. महाराष्ट्रातून पात्र उत्तीर्णांची टक्‍केवारी 40.94 इतकी आहे. शोएब हा ओडिसातून पहिला आलेला पहिलाच विद्यार्थी आहे.

निकालाचे संकेतस्थळ क्रॅश
नीटचा निकाल सायंकाळी 6 वाजता जाहीर झाला. सुमारे अर्धातास “एनटीए’च्या संकेतस्थळावरून काही विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळच खुले होऊ शकले नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत निकालच पाहता आला नाही. रात्रभर हे संकेतस्थळ योग्य पद्धतीने सुरू होईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.