लातूर : देशभरात नीट परीक्षेबाबत गदारोळ सुरू असताना नीट गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला आरोपी संजय जाधव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना दोन दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. नीट गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी संजय जाधव यांची सीबीआय कोठडी आज संपली होती.
आज याबाबत सीबीआय पथकाने कोर्टात हजर केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे. देशभर गाजत असलेला नीट परीक्षेतील घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. नीट अभ्यासक्रमाचे मराठवाड्यातील केंद्र लातूर येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तर आरोपी इराण्णा कोनगुलवार आरोपी अद्याप फरार आहे.
इराण्णा कोनगुलवार याचे निलंबन
देशपातळीवर गाजत असणाऱ्या नीट परीक्षेच्या घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवारवर प्रशासनाने कारवाई केली आहे. काेनगुलवार याला आरटीआय प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत होते. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोनगुलवार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.