नवी दिल्ली – नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात “नीट’ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरामध्ये घेण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेमध्ये राजस्थानच्या नलीन खंडेवालने प्रथम क्रमांक पटकावला असून दिल्लीच्या भाविक बन्सलने द्वितीय तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तृतीय क्रमांक पटकवला आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया व डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांची मान्यता प्राप्त असलेल्या महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असून यावर्षी १४,१०,७५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्या महिन्यामध्ये ५ मे आणि २० मे रोजी ही परीक्षा देशभरामध्ये आयोजित करण्यात आली होती. एकूण 720 गुणांच्या या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी होता.
या परीक्षेला बसलेल्या १४,१०,७५५ विद्यार्थ्यांपैकी ७,९७,०४२ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.