नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारताचा नीरज चोप्रा याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जर्मनीचा जोहानस वेटर हा या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
वेटरला टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत 9 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्याने यंदाच्या मोसमात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच क्रमवारीतील त्याचे अग्रस्थान कायम राहिले आहे.
या क्रमवारीत नीरजचे 1315 गुण असून वेटरचे 1396 गुण आहेत. नीरज आणि वेटर यांच्यात 81 गुणांचा फरक आहे. या क्रमवारीत पोलंडचा मार्सिन क्रुकोवस्की तिसऱ्या, चेक प्रजासत्ताकचा जॅकब वाडलेजचा चौथ्या, जर्मनीचा ज्युलियन वेबर पाचव्या स्थानावर आहे.
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशाला ऍथलेटिक्समधील पहिले पदक जिंकून दिले. नीरजचे लक्ष्य जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे असून ही स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत 15 ते 24 जुलै या कालावधीत होणार आहे.