बुडापेस्ट : जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्यानेपाकिस्तानच्या खेळाडूपेक्षा सरस कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. नीरजने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे नीरज चोप्राला तगडे आव्हान होते. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असल्याचे पाहायला मिळत होते आणि स्पर्धेदरम्यान घडलेदेखील तसेच.
Arshad Nadeem and Neeraj Chopra congratulating each other. Only 0.35m separated both of them tonight. Two supreme athletes and they will meet again in Paris Olympics 🇵🇰🇮🇳❤️❤️ #WorldAthleticsChamps pic.twitter.com/yuksF9ZTMi
— Farid Khan (@_FaridKhan) August 27, 2023
अर्शदने पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचे आव्हान होते. मात्र, नदीमला लीलया मागे टाकत नीरजने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (८४.७७ मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (८४.१४ मीटर) यांच्या कामगिरीनं भालाफेक प्रकारात भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.
नीरज चोप्राचा पहिल्याच फेरी फाऊल झाल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये धाकधुक वाढली होती. पण पुढच्याच फेरीत नीरजनं त्याच्या स्टाईलमध्ये कमबॅक केलं. नीरजच्या हातातून भाला सुटताच तो कुठे पडला हेही न पाहाता आत्मविश्वासानं नीरजनं मागे वळून चाहत्यांना अभिवादन करत आनंद व्यक्त केला.