नीरेची प्राथमिक शाळा आजपासून बेमुदत बंद

लाखांचा निधी देऊनही कार्यवाही होत नसल्याने पालक संतापले

नीरा – येथील प्राथमिक शाळेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यास होत असलेल्या दिरंगाई व चालढकलीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी उद्यापासून (दि. 1 ऑगस्ट) आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दि. 17 जुलै रोजी व्यवस्थापन कमिटीने त्याबाबत ठराव केला होता. जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती यांना कळविण्यात आले होते; मात्र यावर कोणताच तोडगा न निघाल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.

नीरा जिल्हा परिषदेच्या नं. 1 व 2 अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळा एकाच इमारतीत भरत होत्या. मात्र, ही इमारत मोडकळीस आली असून व्यवस्थापन समितीने आपल्या जबाबदारीवर इथे शाळा भरवावी, असा अहवाल कार्यकारी अभियंत्याने गेल्यावर्षी दिला. त्यानंतर तात्पुरती सोय म्हणून दोन महिन्यांसाठी ही शाळा रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीत विभागून बसवण्यात आली. मे महिन्यात याबाबत उपाययोजना करून नवीन इमारत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात ईराकॉन पॅनलच्या वर्ग खोल्या बांधण्याचे आश्‍वासन शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिले होते. त्यानुसार 33 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध होऊन कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली आहे.

मात्र, ऐनवेळी रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या आवारात तात्पुरते वर्ग खोल्या बांधण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बाजारतळावर बांधकामास परवानगी मिळावी म्हणून पालकांनी मागणी केली. मात्र, ग्रामपंचायतीने त्यास नकार दिला. एका खासगी व्यक्तीने दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर शेतजमीन देण्याचा प्रस्ताव दिला; मात्र जिल्हा परिषदेने तो नाकारल्याने जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे येथील शाळा नंबर 1च्या दुसरी व चौथीच्या मुलांना रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर शाळा नंबर दोनच्या तिसरी ब व कच्या मुलींना कन्या विद्यालयाच्या प्रयोगशाळेत दाटीवाटीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. बाकी विद्यार्थ्यांची अवस्थाही काही प्रमाणात तशीच आहे. रयतने साडेसात ते साडेबारापर्यंत वर्ग खोल्या वापरण्याची परवानगी दिली असली तरी माध्यमिकची मुले लवकर येत असल्याने मुलांना अकरा वाजताच वर्गातून बाहेर यावे लागते. त्यामुळे मुलांना अपेक्षित वेळ मिळत नाही.

पालकांनी यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, सध्याच्या चालू स्थितीवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पालक संतापले आहेत.

ती इमारत “रयतला’च हवीय
जिल्हा परिषदेने रयतकडे त्यांच्या आवारात तात्पुरत्या ईराकॉन पॅनलच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, रयतने त्या वर्ग खोल्या तुमची गरज संपल्यानंतर आम्हाला सोडून जाणार असाल तर परवानगी देऊ, अशी अट घातल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली; मात्र जिल्हा परिषदेचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याने व पुढे गरज भासेल त्या ठिकाणी या खोल्या नेण्यात येणार असल्याचे प्रयोजन असल्याने असे करता येणार नाही. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनीही रयतशी संपर्क साधला असता रयतच्या नीरा येथील स्थानिक स्कूल कमिटीनेच तसा प्रस्ताव दिला असल्याची माहिती रयतच्या सचिवांनी दिली.

ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका
नीरा ग्रामपंचायतीने बघ्याची भूमिका घेतली आहे. पालक मुलांच्या बैठक व्यवस्थेबद्दल सांगत असताना काही सदस्य मात्र पुन्हा जुन्या इमारतीत शाळा भरवण्याचा सल्ला पालकांना देत आहेत. नीरा ग्रामपंचायतीमध्ये दोन गटांची सत्ता आहे. या दोन्ही गटांतील नेते पालकांना आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे सांगतात; मात्र, कोणताही तोडगा काढण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांबद्दल नाराजी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.