भोर – भोर तालुक्यातील हिरडस मावळातील नीरा नदीवर असलेले नीरा देवघर धरण आज सकाळी भरले आहे.गेल्या दहा बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर गेले चारपाच दिवसांपासून मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होवून धरण आज शंभर टक्के भरले आहे. नीरा देवघर धरण क्षेत्रात पावसाचा जोर आजही कायम आहे.
नीरा देवघर धरणाची पाणी साठवण क्षमता ११.९१ टीएमसी असून धरणाला पाच दरवाजे असून पाचही दरवाजातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पॉवर हाऊस व धरणाच्या दरवाजातून ९ हजार क्युसेक्स पाणी सध्या विसर्ग करण्यात आले असल्याची माहिती नीरा देवघरचे उपविभागीय अभियंता अनिल नलावडे यांनी दिली.
सद्य स्थितीत धरणावर शाखा अधिकारी श.सि.किवडे,मोजणीदार दत्तात्रय कापरे,चौकीदार संतोष कंक, सुनिल रेणुसे,संतोष डोईफोडे,निवृती रेणुसे,किसन चंदनशिव उपस्थित होते. धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असुन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
भाटघर व नीरा देवघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ३ जिल्ह्यांत आणि ९ तालुक्यांतील सुमारे २ लाख ५० हजार क्षेत्र ओलिताखाली येते. या वेळी धरण १०० टक्के भरल्यामुळे पूर्वेकडील नागरिकांची भविष्यात पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत.