पाणी हवे की बांधकामे? शिवसेनेने स्पष्ट करावे

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे आव्हान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पुरेसे पाणी हवे की नवी बांधकामे हवी आहेत? हे शिवसेनेने प्रथम स्पष्ट करावे, असे आव्हान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि.7) केले. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शहरातील पाणी समस्येवर सत्ताधाऱ्यांनी मार्ग काढण्याची गरज व्यक्‍त करताना नव्या बांधकामांची परवानगी बंद करू नये, अशी मागणी केली होती. त्यावर पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वरील आव्हान दिले.

शहराचा पाणीपुरवठ्यावर ताण पडू नये, म्हणून भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी नव्याने बांधकाम परवाने देऊ नये, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यावर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी टीका करीत सत्ताधारी पाणी प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. तसेच, बांधकाम परवाने देणे थांबवू नये, अशी मागणी केली आहे. त्यावर सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली.

पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पवना धरणातून उचलले जाणारे 480 एमएलडी पाणी शहराला पुरत नाही. परिणामी, काही भागांतून पाण्याचा तक्रारी आहेत. त्यामुळे नवीन बांधकामांना परवाने देऊ नये, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. भाजपकडून शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. नवीन स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच गळती रोखण्यावर भर दिला जात आहे. तसेच, विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

खड्डे मेट्रोकडून दुरुस्त करून घेणार
दापोडी ते चिंचवड या मार्गावर महामेट्रोचे काम सुरू असल्याने चांगले रस्ते खराब होऊन खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व खड्डे महामेट्रोकडून दुरुस्त करून घेतले जाणार आहे. त्यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात येतील, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)