लक्षवेधी: निर्माल्य व्यवस्थापनाबाबत स्वयंशिस्त हवी

विठ्ठल वळसे पाटील

गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मोठा प्रश्‍न निर्माण होतो तो निर्माल्याचा. नागरिक निर्माल्य तळे, नदी किंवा समुद्रात टाकतात त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होत आहे. सुजाण नागरिकांनी निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे ही समतोल पर्यावरणाची गरज आहे.

भारतात वर्षात अनेक सणवार असतात यात विशेषतः हिंदू धर्मात रितीरिवाजप्रमाणे प्रत्येक महिन्यात विविध धार्मिक कार्य, सणवार, यात्रा, उत्सव, व्रत वैकल्य, तसेच अनेक धार्मिक समारंभ असतात. या कार्यक्रमांच्या विसर्जनसमयी निर्माल्य नदी, तळी, तलाव, घाट, विहीर आदी नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जित केले जातात. यामुळे नैसर्गिक स्रोतांच्या सौंदर्याला बाधा येते.

शहरीभागाबरोबर आता ग्रामीण भागाचे शहरीकरण होत चालले असून जलप्रदूषणाबाबत वारंवार जनजागृती करावी लागते. त्यामुळे निर्माल्य असो अथवा व्यक्‍ती मृत्यू पश्‍चात हस्ती विसर्जन असो, जल प्रदूषणाचा प्रश्‍न हा शासन दरबारी नव्हे तर जाणिवेतून व स्वयंशिस्तीतून सुटेल.
आज भारतातील सर्व नद्या कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रदूषित झाल्या आहेत. 2014 साली स्वच्छ भारत मिशनची सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त 2019 पर्यंत लक्ष प्राप्ती होती परंतु आज मात्र भरीव कार्य झालेले दिसत नाही.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या पाहणी आकडेवारीत देशभरातील एकूण 1 कोटी 45 लाख 40 हजार 900 जलस्रोतांपैकी 91 लाख 1 हजार 192 जलस्रोतांच्या तपासणीत 21 लाख 23 हजार 948 जलस्रोतांत रसायनांचे तर 11 लाख 7 हजार 13 जलस्रोतांमध्ये जीवाणूंचे प्रमाण आढळून आले आहे. महाराष्ट्रात 5 लाख 92 हजार 743 जलस्रोतांपैकी 4 लाख 66 हजार 893 जलस्रोतांची तपासणीत 99 हजार 609 जलस्रोतांवर रासायनिक तर 71 हजार 875 जलस्रोतांवर जीवाणूजन्य प्रभाव आढळले आहे. या आकडेवारी शासकीय असल्या तरी यापेक्षा वास्तव अधिक असू शकते.

देशातील प्रमुख 317 नद्या तर महाराष्ट्रातील 56 नद्या प्रदूषित झाल्या आहेत. यात विशेषतः नदी लगत औद्योगीकरण झाले आहे त्यामुळे रसायन व सांडपाणी मिसळल्याने प्रदूषण वाढत चालले आहे. भविष्यात जर जलस्रोत टिकले तर जीवन समृद्ध होणार आहे. म्हणूनच “जल है तो कल है’ हे लक्षात घेतले पाहिजे. जल प्रदूषण करण्यात प्रत्येकाचा काहीतरी वाटा आहेच. त्यामुळे त्याच्या निवारणाचे कर्तव्यसुद्धा आपलेच आहे. त्यामुळे धार्मिक कार्यात जलस्रोतांना प्रदूषित करणं म्हणजे जलसंस्कृतीला गालबोट लावण्या सारखे आहे.

निर्माल्य जलस्रोतांत विसर्जित केल्याने प्रदूषणाबरोबर पाणी दूषित होते. त्यामुळे मनुष्य व जनावरांना पाणी पिण्यास योग्य राहत नाही. त्यामुळे पवित्र समजल्या जाणाऱ्या नद्या दूषित झाल्या आहेत. भारतात गणेश उत्सव, नवरात्र, होळी आदी मोठ्या सणातून पाने, फुले, हार, फळे, केळीचे खांब, नारळाची पाने, अशा विसर्जित निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंचा खत निर्मितीसाठी उपयोग होतो तर सजावटीत वापरलेली अविघटनशील वस्तू यात प्लॅस्टिक, कागदी पुठ्ठे पुनर्प्रक्रियेसाठी वापरता येतात. अनेक समाजशील संस्था पर्यावरणाच्या रक्षणासाठी हाक देत असतात.

निर्माल्य तळ्यात किंवा नदीत टाकून देऊन पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा अशा संस्थांकडे दिल्यास खत निर्मितीसाठी वापरता येते. परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या वस्तू पाण्यात विरघळत नाही शिवाय त्याच्यापासून पुनर्प्रक्रिया होत नाही. यात अनेक मूर्ती या नदीतील पाणी ओसरल्या नंतर भग्न अवस्थेत दिसून येतात हा धार्मिक अवमानही आहे. याची तमा बाळगली पाहिजे. पर्यावरणपूरक मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे विघटनास मदत होते. भव्य दिव्य मूर्ती स्थापना ही एक आता स्पर्धा झाली आहे.

या स्पर्धेत मात्र पर्यावरण संवर्धन हा विषय बाजूला राहतो. निर्माल्य टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने निर्माल्य कलश नदीकाठी ठेवले जातात.अनेकदा ते पूर्ण भरलेले असतात अशावेळी नागरिक जलप्रवाहात निर्माल्य टाकतात. त्यामुळे योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवले पाहिजे. अनेक शहरे ही स्वच्छ राहण्यासाठी नियम व सुभाषिते लिहावी लागतात. स्वयंशिस्त नसल्याने असे नियम लिहावे लागतात. भारत भेटीस आलेल्या परदेशी पाहुण्यांना याबाबत संकोच वाटत राहतो. कलशामध्ये निर्माल्य टाकतानासुद्धा विघटित, अविघटीत असे वर्गीकरण करून टाकले पाहिजे. जेणे करून समाजसेवी संस्थांना सहज वापरता येईल. धर्म संस्कृतीबरोबर पर्यावरणाचे रक्षण हाती घेतले तर देश अधिक शोभून दिसेल.

प्रत्येक गाव, नगर, उपनगरात प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळे असतात. वर्षभर अनेक धार्मिक कार्य, उत्सव, यात्रा असतात. मिरवणूक, पालखी यानिमित्त सजावट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे निर्माल्यही जास्त असते. नदी, तळी, तलाव, ओढे, नाले, विहीर आदी जलस्रोतांच्या ठिकाणी निर्माल्यबरोबर कुजणाऱ्या व न कुजणाऱ्या वस्तूंचेही विसर्जन केले जाते. असे निर्माल्य जमा करणारे अनेक भागांत निसर्ग प्रेमी आहेत. यांच्याकडून व्यवस्थापन व जनजागृतीचे काम केले जाते. सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयीन मुले निसर्ग वाचवण्यासाठी पुढे येतात परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. जल, जंगल, जमीन, जनावर त्यांना तारणारे पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास लोकसहभागाने झाला पाहिजे. स्वच्छ भारत, समृद्ध भारत असा विचार जर जगभर पोहचवायचा असेल तर स्वंय शिस्तीचा अंगीकार केला पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)