“गरज सरो अन्‌ वैद्य मरो,’ही खासदारांची जुनी सवय

आ. शिवेंद्रसिंहराजे : माझे आपुलकीचे सेटिंग जनतेशी!

सातारा – लोकसभा निवडणुकीआधी उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते? लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्यांची भाषा आणि वागण्यात कसा बदल झाला आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांची भाषा आणि वागणे कसे चालू आहे, हे सातारकर जनता बघत आहे.

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरान्वये कसलाही संबध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्‍त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम व विकासकामांपुरते आहे. “गरज सरो अन वैद्य मरो,’ ही खासदारांची जुनी सवय असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात संगनमत असल्याचे वक्‍तव्य केले होते. यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. “”लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजे यांचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्‍यावरुन ते सिध्द होत असून सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी उदयनराजे यांची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनेतला चांगलेच माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हेही सगळ्यांनाच दिसत आहे. निरा देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदारसंघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरु असलेले भांडण कशासाठी आहे, हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “”लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्या मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्‍यावरुनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जे बोलत होते त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे. मात्र, उदयनराजेंच्या वागण्यात आणि बोलण्यात आता फरक जाणवायला लागला आहे, हे जनताही पाहात आहे. सातारकरांनाही हे चांगलेच माहिती आहे. कोण कसं वागतंय हे सातारकरांनी व सातारा- जावळीतील जनतेनं बघावं, कोणं कसं बदललयं हेही पाहवं.

मी सातारा- जावळीतील जनतेशी नेहमीच बांधिल राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधिल राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदारसंघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापी विसरत नाही. त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही.” खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करु नये, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.